चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या : पतीवर खुनाचा गुन्हा दाखल

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन आरोपीने खूनी खेळ खेळल्याची घटना

भद्रावती तालुक्यातील कुचना येथील घटना 

अतुल कोल्हे भद्रावती 
भद्रावती तालुक्यातील माजरी येथे चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीसह मुलीला धारदार चाकूने वार करून गंभीर जख्मी केल्याची घटना गुरुवारी  दुपारी माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना कॉलनीत ब्लाक – १० मधील क्वार्टर नंबर – ७७ मध्ये घडली. वीरेंद्र रामप्यारे साहानी (४३ ) असे आरोपीचे नाव असून, माजरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी साहानी हा वेकोलि माजरीच्या खुल्या खाणीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून पत्नी सुमन (३६) व एक मुलगी सिमरन (१७) मुलगा करण (१५) व आलोख (१३) यांच्यासह वेकोलिच्या कुचना कॉलनीत ब्लॉक – १० मधील मधील क्वार्टर नंबर – ७७ मध्ये राहत होता.

वीरेंद्र साहानी याला पत्नी सुमन हिच्या चारित्र्यावर संशय होता. हे मुलं माझे नाही असे म्हणून नेहमी भांडण करत होता. गत अनेक दिवसांपासून ताे पत्नीला याच कारणावरून मारहाण करीत हाेता़. दरम्यान, गुरुवारी दुपारी दाेघांमध्ये प्रचंड वाद झाल्यानंतर पती वीरेंद्र साहानी याने पत्नी सुमनच्या छातीवर व पोटात चाकूने सपासप पाच वार केला.या मारहाणीत मूलगी सिमरन हिलासुद्धा पोटात चाकुने वार करून रक्तबंबाळ केले.पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पतीने हे हत्याकांड घडवून आणले. घटनेनंतर त्याच अवस्थेत त्यांना सोडून आपल्या क्वार्टरच्या वरुन उडी मारून वसाहतीची भिंत ओलांडून आरोपी तेथून पसार झाला. दरम्यान जख्मी अवस्थेत सुमन व मूलगी सिमरन ब्लॉक मधील तळमजल्यातील क्वार्टरच्या समोर येवून खाली पडली. त्याच दरम्यान शेजारच्या लोकांनी धाव घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत बेशुध्द पडलेल्या सुमन व सिमरनला वेकोलि माजरीच्या क्षेत्रीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरु असताना पत्नी सुमन हिचा मृत्यु झाला. दरम्यान मूलगी सिमरन गंभीर जख्मी असल्याने तिला उपचाराकरिता वेकोलिच्या रुग्णालयातून चंद्रपुरच्या खाजगी रुग्णालय कुबेर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. सद्या सिमरनची प्रकृति बरी असल्याची माहीती आहे. आरोपी वीरेंद्र साहनी हे आपल्या घरात खूनी खेळ खेळून वसाहतीची भींत ओलांडून विसलोन गावाच्या रेलवे मार्गाने पसार होत असताना माजरी पोलिसांनी कुचना येथील काही युवकाच्या साहाय्याने सिनेस्टाइलने त्याच्या पाठलाग करून त्याला पकडले.

या प्रकरणी आरोपी विरुद्ध ३०२, ३०७ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.आरोपीला आज भद्रावतीच्या न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आरोपीचा चंद्रपुरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली.
याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नीपानी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विनीत घागे करीत आहे.

आरोपी वीरेंद्र साहानी हा मागील अनेक वर्षापासून गांजा व बुक्कीचे व्यसनी होता. त्याचे तीन मुलांचा आपले संतान नसल्याचे शंका मनात बाळगुन होता. त्या कारणाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून वारंवार घरी भांडण करीत होता. दरम्यान आपल्या मुलांचे डीएनए चाचणी करण्याकरिता एका वकीलाकडे संपर्क केल्याची माहिती सूत्रानी दिली.