पन्नास टक्के क्षमतेने शाळा सुरु करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे

शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांची मागणी

मूल (प्रतिनिधी) : कोरोना संक्रमणामुळे शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, यानिर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन शासनाने 50 टक्के क्षमतेनुसार शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री नामदार उध्दव ठाकरे यांचेकडे शिवसेनेचे मूल तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केली आहे.

शासनाने गेल्या 20 महिण्यामध्ये कोरोना काळात बंद केलेल्या शाळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक नुकसान झालेले आहे, शाळा बंद करताना शासनाने विचारपुर्वक निर्णय घेणे अपेक्षित होते, मात्र चुकीच्या लोकांचे सल्ले घेवुन शासन विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान करीत आहे. शाळा बंद असल्यामुळे संपूर्ण पिढी या निर्णयाने देशोधडीला लागणार आहे. शहरी भागात आणी ग्रामीण भागात शिक्षणाचे विकेंद्रीकरण होऊन ग्रामीण भागातील मुलांवर या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय होऊन ते शिक्षण प्रवाहापासून दूर जाऊ शकतात. गरिबी, अठराविश्व दारिद्य्र यात ग्रामीण विद्यार्थी होरपळून जाईल. मोरमजुरी करणाया मजुरांच्या मुलांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. यामुळे शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पन्नास टक्के क्षमतेने शाळा आणी खाजगी कोचिंग क्लासेस सुरु करून विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवावी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही थांबवावे अशी मागणी मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी मुलचे तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री नामदार उध्दव ठाकरे, राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांना निवेदन पाठवुन केली आहे.

यावेळी शिवसेनेचे मुल शहर प्रमुख राहुल महाजनवार, युवा सेना तालुकाप्रमुख संदिप निकुरे, शहर समन्वयक अरविंद करपे, महिला तालुकाप्रमुख रजनी झाडे ,युवासेना सरचिटणीस विनोद काळबांडे व शिवसैनिक उपस्थित होते.