स्वतःचे फोटो समोर भावपुर्ण श्रध्दांजली लिहुन शिक्षकाने केली आत्महत्या


पोलीसांनी केली आकस्मात मृत्युची नोंद

चाकुर (प्रतिनिधी) : आदर्श कॉलनीतील एका भाडयाच्या खोलीमध्ये राहात असलेल्या जिल्हा परीषद शाळेतील सहा. शिक्षकाने व्हॉट्सअप ग्रुपवर स्वताचा फोटो समोर भावपूर्ण श्रध्दांजलीची पोस्ट टाकून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच चाकूर येथे घडली आहे. सचिन शिवराज अंबुलगे वय 40 वर्षे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नांव आहे.

लातुर जिल्हयातील चाकूर येथील जिल्हा परीषद मुलांच्या शाळेत सचिन शिवराज अंबुलगे (40) हे सहा.शिक्षक म्हणून कार्यरत होते, ते शहरातील आदर्श कॉलनीतील एका भाड्याच्या खोलीमध्ये ते कुटुंबीयासह राहत होते. त्यांच्या पत्नी व मुलगा गावाकडे गेले असता गुरूवारी रात्री अंबुलगे यांनी शाळेतील शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर स्वताचा फोटो टाकून भावपुर्ण श्रध्दांजली असे लिहले, तसेच त्यांनी आत्महत्या करीत असल्याबाबत नातेवाईकांनाही सांगितले होते.

शुक्रवारी सकाळी नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता साडीच्या साह्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मयत अंबुलगे यांच्या जवळून चिठ्ठी आढळून आली आहे. अंबुलगे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

याबाबत भाऊ रविंद्र अंबुलगे यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. देवणी या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले असून, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परीवार आहे.