आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वनविभागाचा श्रमिक एल्गार कडून तीव्र निषेध

मुख्यमंत्र्याकडे वनविभागाची तक्रार

कोरपणा (प्रतिनिधी) : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वन जमिनीवरील शेतकऱ्यांचे पिक नष्ट करून शेतात खड्डे खोदून झाडे लावण्याचा काम वनविभाग करीत असून वनविभाग अत्याचाराचा कळस गाठत असल्याचे प्रकार घडत आहेत. कोरपना तालुक्यातील मांडवा येथील वामन रामभाऊ कोल्हे यांच्या शेतात वीस ते तीस वनविभागाचे कर्मचारी जाऊन उभ्या पिकाची नासधूस करून डोजरणे खड्डे खोदले असल्याने यात श्री. कोल्हे यांच्या पिकाची प्रचंड नुकसान झाली हा धक्का सहन न झाल्याने दिनांक 21 जानेवारी  रोजी कोल्हे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याने पुन्हा एकदा वनविभागाची दादागिरी चव्हाट्यावर आली आहे.

या घटनेचा तीव्र निषेध श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनश्याम मेश्राम यांनी केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे उपविभागीय अधिकारी राजुरा यांचे मार्फत निवेदन पाठवून वनविभागाचा वाढता अत्याचार थांबविण्यात यावा अशी मागणी केली आहे.

राजुरा उपविभाग हे पूर्वी निजामाच्या अधिपत्या खाली होता यामुळे 1930 चा कुठलाही पुरावा शासनाकडे ऊपलब्ध नसल्याने          गैरआदीवासी पुरावे देणार कुठून ? असा प्रश्नही घनश्याम मेश्राम यांनी उपस्थित केला आहे.