बेरोजगार युवक-युवतींना रोजगार नोंदणी कार्ड अद्ययावत करण्याचे आवाहन

उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आवाहन

चंद्रपूर (प्रतिनिधी) : बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अद्याप रोजगार नोंदणी कार्डची नोंदणी केली नाही किंवा अद्ययावत केले नाही, अशा उमेदवारांनी आधार कार्ड ,नावात बदल, पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता याबाबतची माहिती नमूद संकेतस्थळावर जाऊन अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

माहिती अद्ययावत करण्यासाठी माहिती पुढीलप्रमाणे :

उमेदवारांचा जुना यूजर आयडी, रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकून खाते उघडावे. आपला आधार क्रमांक व माहिती अचूक टाकल्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून पुन:श्च सबमिट करावे. त्यानंतर उमेदवारांनी माहिती भरून पासवर्ड तयार करावा व तो सबमिट करावा. त्यानंतर उमेदवारांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर युजर आयडी व पासवर्ड येईल. त्यानंतर मुख्य पानावर जाऊन यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगीन करावे. वैयक्तिक शैक्षणिक व अन्य माहिती भरून प्रिंट काढता येईल. उमेदवारांना नोंदणी करतेवेळेस काही अडचण उद्भवल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा.