जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश

मूल तालुक्यातील टेकाडी येथील 48 जनावराची सुटका

मूल (प्रतिनिधी) : मूल तालुक्यातून तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात कत्तलीसाठी कंटेनरमध्ये जनावरे कोंबून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दापाश केलेला आहे. मूल तालुक्यातील टेकाडी येथून 48 जनावरांची सुटका करीत 5 जणांना ताब्यात घेतले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यच्या जवळ असलेल्या तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे मोठ्या प्रमाणात नेण्यात येतात. तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या बाराचाकी वाहनात जनावरे निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जाते. जनावरांची तस्करी करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गाने जात असतात. याबाबतच्या तक्रारी पोलिस विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांवर आळा बसावा, यासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी विशेष पथक तयार करून जनावरांची तस्करी करणाऱ्यांवर पाळत ठेवली होती.

गडचिरोली जिल्ह्यातून 10 चक्का ट्रक व 12 चक्का ट्रक आणून मुल तालुक्यातील टेकडी गावाजवळ जनावरे कोंबून तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात वाहतूक केली जात असल्याची माहिती  स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसह मुल तालुक्यातील टेकडी गावाजवळ सापळा रचला. त्यानंतर टेकडी शेतशिवरात दोन्ही ट्रक ताब्यात घेतले.

यावेळी गजानन सायन्ना पेदापुरे (वय २७, रा. कोटेक्लुर ता. देगलुर जि. नांदेड), मोहम्मद अली अजगर अली सय्यद (वय ५६, रा. टेकाडी ता. मुल जि. चंद्रपुर), जाकीर ईब्राहीम खान (वय २९ रा.जंगेमुल ता. पुडुर जि. ईखाराबाद तेंलगना, ), मोहम्मद नदिम मोहम्मद अयुब (वय २३, रा. बनत ता. जि. सांबली), नितेश जंगीदर यादव (वय २७, रा. भवानी बिगह ता. चिकसोला जि. नालंदा) यांच्याविरुद्ध मुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. व 5 आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, पंडीत वराडे, महांतो, मिलींद चव्हान, दिपक डोंगरे, नितेश महात्मे, दिनेश, प्रमोद कोटनाके, मयुर येरणे, प्रसाद धुळगंडे यांच्या पथकाने केली.