उच्च दाबाच्या ताराला पतंग अडकल्याने मुलगा भाजला

मुलावर नागपुर येथे उपचार सुरु
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने मदत

अतुल कोल्हे भद्रावती :- वरोरा तालुक्यातील बोर्डा येथे पतंग उडवत असताना अचानक उच्च दाबाच्या ताराला पतंग अडकल्याने शॉट सर्किट होऊन पतंग उडवीणारा मुलगा गंभीर भाजला, त्याच्या उपचाराकरीता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने काल (दि.३१) ला दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली.

आदित्य उमेश येटे हा १२ वर्षाचा मुलगा त्याच्या मित्रांसह घराच्या मागे असलेल्या पाय-यांवर उभे राहून पतंग उडवत असतांना अचानक उच्च दाबाच्या ताराला पतंग अडकल्याने मोठा आवाज होत शार्टसर्किट होऊन गंभीररीत्या भाजला. ही घटना दि. २८ जानेवारीला सकाळी ९:३० वा घडली. तात्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन प्राथमिक उपचार करुन त्याच्यावर चंद्रपुर येथील पोतदार हॉस्पिटलमधे उपचार सुरु करण्यात आले. व आता नागपुर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर घटना ही मोठीच होती. शार्ट सर्किटमुळे आजूबाजुच्या घरचे दोन-तीन मीटर जळाले. घटनास्थळी पोलिस प्रशासन व महावितरणच्या कर्मचा-यांनी परीस्थिती हाताळली.

सदर मदत ही आदित्यची आत्या ताराबाई सुखदेव येटे व बहिण दिव्यानी उमेश येटे यांना स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवि शिंदे यांचे हस्ते देण्यात आली. यावेळी रवींद्र शिंदे, दत्ताभाऊ बोरेकर, पांडुरंग गावंडे, विनोदजी निमसटकर, तुळशीदास आलाम, आदी उपस्थित होते.

पतंग उडवित असतांना पालकांनी मुलांसोबत असावे व दक्षता घ्यावी. महावितरणने उच्च दाबाच्या तारांची नियमीत पाहणी करुन शार्ट सर्किट होवू नये, असे नियोजन करावे, असा संदेश देण्यात आला.