भाजपाचे सहकार क्षेत्राकडे होत असलेले दुर्लक्ष कॉगेसच्या फायदयाचे

जुन महिन्यात बाजार समितीची निवडणुक लागण्याची शक्यता

मूल (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांसाठी हिताची असलेल्या विविध कार्यकारी आणि सेवा सहकारी संस्थेमध्ये सध्यास्थितीत कॉंग्रेसचे प्राबल्य आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती, आदर्श खरेदी विक्री सहकारी संस्थेवरही कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. तालुक्यात भाजपाचे सहकार क्षेत्राकडे होत असलेले दुर्लक्षामुळेच कॉंग्रेससाठी हे फायदयाचे ठरत असल्याने भाजपातील काही सहकार चळवळीतील कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात मोठया प्रमाणावर शेतकरी राहतात, यापरिसरात भात गिरण्याही मोठया प्रमाणावर आहे, सहकार क्षेत्राशी निगळीत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, आदर्श खरेदी-विक्री सहकारी संस्था, यासह विविध कार्यकारी सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, आदीवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे जाळे मूल तालुक्यात मोठया प्रमाणात आहे, मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणुक नुकताच पार पडली, याठिकाणी भाजपा आणि कॉंग्रेसकडुन निवडणुक लढविण्याची तयारी दर्शविली होती मात्र ऐनवेळी अविरोध निवडणुक पार पडली, याठिकाणी कॉंग्रेसचे 7 तर भाजपाचे 6 उमेदवार अविरोध निवडुण आले, राजोली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणुक काही दिवसावर येवुन ठेपली आहे, याठिकाणीही ऐनवेळेवर अविरोध निवडणुक होण्याची शक्यता आहे.

मूल तालुक्यातील मारोडा, मूल, चिरोली, दांबगांव, भेजगांव, नांदगांव, चंादापूर, फिस्कुटी, डोंगरगांव, चिखली, राजगड, नवेगांव भुजला, जुनासुर्ला, मूल प्राथमिक, आदिवासी विविध कार्यकारी यासंस्थेनी अजुनही मतदार यादी सहा. तालुका निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे पाठविलेली नसल्याने यासंस्थेच्या निवडणुका लांबणीवर गेलेल्या आहेत..

तालुक्यातील बहुतांश विविध कार्यकारी आणि सेवा सहकारी संस्थेवर कॉंग्रेसची सत्ता आहे, बोटावर मोजण्याइतकेच भाजपाचे सदस्य काही संस्थेत असल्याचे दिसून येत आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील निवडणुकीत भाजपाने ऐनवेळेवर उडी घेतली होती, यावर्षी जुन महिन्यात मूल कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक लागण्याची शक्यता आहे, भाजपा यानिवडणुकीत कोणती भुमीका घेते हे अजुन तरी गुलदस्तात आहे.