मिनी मंत्रालयासाठी राजकीय पक्षाच्या वाढल्या हालचाली

चंद्रपूर प्रतिनिधी:- चंद्रपूर मिनी मंत्रालयाचा कार्यकाल येत्या 20 मार्च 2022 रोजी पूर्ण होत आहे पण अजूनपावेतो राज्य निवडणूक आयोगाने मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला नसल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या नजरा निवडणूक आयोगाकडे लागलेल्या आहे.

लोकसंख्येनुसार जिल्ह्यातील गट व गणाची संख्या वाढत असून राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला नवीन आदेशानुसार गट व गणाचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती गट आणि गणाचा कच्चा आराखडा जिल्हा निवडणूक प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेला असून या आराखड्यात 5 नवीन गट आणि 10 नवीन गनाचा समावेश करण्यात आला आहे मात्र यावर हरकती व सूचना मागविण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

मिनी मंत्रालयात सध्या भारतीय जनता पार्टीची सत्ता असून भाजप 33 काँगेस 20 व अपक्ष 3 असे पक्षीय बलाबल आहे. निवडणुका काही महिन्यातच होणार असल्याने कांग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांनी उमेदवाराच्या चाचपण्या सुरू केल्याने राजकीय रंगत वाढलेली दिसत असून गावागावातील राजकीय धुरीण कामाला लागेलेले बघायला मिळत आहे. सामान्य जनतासुद्धा तितक्याच उत्सुकतेपणे राजकीय चर्चा चवीने चघळत,आरक्षणानुसार कोण उमेदवार राहील याचे आराखडे बांधल्या जात आहे.