ग्राम पंचायत सदस्यांचे प्रलंबित असलेली जात वैधतेची प्रकरणे तात्काळ निकाली काढा – वंचित बहुजन आघाडीची निवेदनातून मागणी

प्रमोद मेश्राम चिमूर:-मागील वर्षी सन 2021 मध्ये गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये पोचपावतीच्या भरोश्यावर निवडणुक आयोगाच्या नियमानूसार राखीव जागेवर उमेदवारांकडून अर्ज भरण्यात आले. मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उमेदवारांचे जात वैधता प्रकरणे निकाली काढण्यास दिरंगाई झाली. त्यामुळे आजच्या घडीला निवडुण आलेल्या उमेदवारांचे ग्राम पंचायत सदस्यपद धोक्यात असल्याने प्रलंबित असलेली जात वैधतेची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे, या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयूक्त चौधरी यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, उमेदवारांनी डिसेंबर 2020 मध्ये कार्यालयात जमाती वैधता पडताळणी साठी अर्ज केल्याची पोचपावती निवडणूक उमेदवारी अर्जासोबत जोडली. निवडणुकीमध्ये निवडूण आल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत जमाती वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागतात. मात्र एक वर्षानंतरही प्रकरणे प्रलंबितच असल्याने सदस्यत्व पद धोक्यात आहे. सदर निवडूण आलेल्या सदस्यांना तहसिलदारांनी जमाती वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सात दिवसाची मुदत देत असल्याचे नोटीस काढलेले आहे. त्यामुळे जमाती पडताळणी समितीने प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम पंचायत सदस्यांना दिलासा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना सहआयुक्त चौधरी यांनी सांगितले की, ग्राम पंचायत निवडणूकीत उभे असलेले उमेदवार ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडूण आलेले आहेत. परंतू ज्या उमेदवारांच्या जमाती वैधता पडताळणीची प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांनी सहआयुक्त अनुसूचित जाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय गडचिरोली येथे संपर्क साधावे किंवा कार्यालयाला भेट द्यावी असे सांगितले.

निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर, जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे, नेते बाळू टेंभुर्णे, महिला आघाडी माजी जिल्हाध्यक्ष मालाताई भजगवळी, कोषाध्यक्ष गजानन बारसिंगे, योगेंद्र बांगरे, संदिप सहारे, विकास बारेकर, उपसरपंच देविदास नन्नावरे, अण्णाजी गोळे, गजानन ठाकरे, अरविंद यादव, सदस्य संजय मडावी, सरपंच शितल मुंडरे, पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.