वाळू तस्करीतही ‘पुष्पा’; म्हणतोय प्रशासनासमोर झुकेगा नही साला!

वर्धा प्रतिनिधी : चंदन तस्करीतून मजूर ते माफिया असा प्रवास करणाऱ्या’पुष्पा’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

वर्धातही काहींनी वाळू तस्करीतून बिल्डर ते लोकप्रतिनिधी अशी मजल मारली आहे. त्यांची ही प्रगती पाहून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांनी वाळू तस्करी सुरू केली असून सध्या त्यांच्यावरही ‘पुष्पा’चे गारुड आहे. रात्रभर अवैधरित्या उपसा करून ‘आपला नाद करायचा नाय, आमच्या वाट्याला जाल तर खबरदार, आपलं एकच काम भरा रेती, करा खाली’ असे स्टेटस मोबाइलवर पहावयास मिळत असल्याने, त्यांनी ‘प्रशासनासमोर झुकेगा नही साला’ अशीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यामधील आठही तालुक्यात आर्वी, देवळी, समुद्रपूर व हिंगणघाट या तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाळू घाट आहे. गेल्यावर्षी चार वाळू घाटांचा लिलाव झाला होता तर तीन वाळू घाट शासकीय योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यावर्षी सहा घाटांचा लिलाव झाला आहे परंतु तीनच घाटधारकांनी पूर्ण रक्कम भरली आहे. विशेषत: लिलावानंतरही लिलाव झालेल्या आणि न झालेल्या घाटातून अवैधरित्या वाळू उपसा चालतात. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींचा हस्तक्षेपही वाढला आहे.

यासोबतच राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई करताना अधिकाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून कारवाईला न घाबरता महसूल आणि पोलीस प्रशासनासमोर ‘झुकेगा नही साला’ अशाच अविर्भावात सध्या वाळू तस्कर वावरताना दिसत आहे.

वाळू तस्करांचा अधिकाऱ्यांवर हल्ला…– वाळू तस्करांचा रात्रीच्या अंधारातच खेळ चालत असल्याने अधिकाऱ्यांनाही कारवाईकरिता अडचणी निर्माण होता. अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन चालविणे, धमकाविणे आदी प्रकार इतरत्र घडतांना दिसतात. परंतु जिल्ह्यामध्ये वर्षभरात एकाच ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचे प्रकरण दाखल आहे.

– हिंगणघाट तालुक्यामध्येच अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. परंतु या अवैध वाळू व्यवसायामध्ये वर्षभरात किमान चार ते पाच मजुरांना आपला जीव गमवावा लागला.

उत्खननाची १६६ प्रकरणे– जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये वर्षभरात वाळू, मुरूम, दगड या गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक संदर्भात १६६ प्रकरणे दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ११२ प्रकरणे फक्त वाळू संदर्भातील आहे. प्रशासनाकडून ११ गुन्हे दाखल केले असून १३ आरोपींना अटक केली. तसेच याप्रकरणी ५ कोटी १९ लाख ७४ हजार ९१६ रुपयांचा दंड आकारला आहे.

तस्करांनी वाढविले वाळूचे भाव– जिल्हा खनिकर्म विभागाकडून दरवर्षी वाळू घाटांचा लिलाव केला जातो. परंतु घाटधारक लिलावाकडे पाठ फिरवितात. किंवा एक घाट लिलावात घेऊन लगतच्या दुसऱ्या घाटामध्ये उत्खनन करतात.

– जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याने याच स्पर्धेतून सर्वसामान्यांना कमी दरात वाळू मिळणे कठीण झाले आहे. अवैधरित्या स्टॉक करून दामदुप्पट दराने विक्री केली जात असल्याची ओरड होत आहे.