सिंदेवाहीत 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 दिव्यांग व्यक्तिंना प्रमाणपत्राचे वाटप

चंद्रपूर (प्रतिनिधी) : परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा मिळाव्यात. त्यांना उपचारासाठी वारंवार चंद्रपूर येथे जावे लागू नये, यासाठी सिंदेवाही येथे 25 कोटी रुपये खर्चून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे. पुढील दोन महिन्यात रुग्णालयाच्या बांधकामाला सुरूवात होईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग व्यक्तिंना दिव्यांगाचे प्रमाणपत्र वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार नामदेव उसेंडी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, जि.प.सदस्य रमाकांत लोधे, नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, नगरसेवक सुनील उट्टलवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रोहन झाडे, प्रकाश देवतळे आदी उपस्थित होते.

केंद्र शासनातर्फे सिंदेवाही येथे 20 बेडच्या कोविड सेंटरला मान्यता मिळाली असून त्याचेही बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, दिव्यांग व्यक्तिंची स्थानिक स्तरावरच तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाला शिबिर घेण्याच्या सुचना केल्या होत्या. यापूर्वी प्रमाणपत्रासाठी चंद्रपूर येथे जावे लागत होते. आता मात्र सदर प्रमाणपत्र येथे उपलब्ध झाले आहे. आज 50 दिव्यांगाना त्याचे वाटप करण्यात येईल.

पुढे ते म्हणाले, सिंदेवाही येथील शिवाजी चौकात छत्रपतींचा अश्वरुढ पुतळा उभारून चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यात हायमास्ट दिवे, पेवर ब्लॉक व सीसीटीव्ही कॅमेरा आदींचा समावेश आहे. त्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत. येथील मुख्य रस्त्याच्या क्राँक्रीटकरणाला पुढील महिन्यात सुरूवात होईल. त्यासोबत पथदिवे आणि फुटपाथची निर्मिती करण्यात येईल. पाथरी – हिरापूर रस्त्यासाठी 250 कोटींचा निधी मंजूर आहे. तसेच पाथरी रस्त्यावरील रेल्वे क्रॉसींगकरीता पुढील वर्षात 90 कोटी रुपये खर्च करून उड्डाणपुल बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे लोकांचा त्रास कमी होईल. गोसेखुर्द सिंचन योजनेचे विभागीय कार्यालय या वर्षात सिंदेवाही येथे आणण्याकरीता आपले प्रयत्न सुरू आहे. येथील नवीन स्मशानभुमीचे बांधकाम पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

रणरणत्या उन्हात अनवाणी पायाला चटके सोसणाऱ्या लेकींना मिळाली पालकमंत्र्यांच्या माणुसकीची सावली

लोंढोली ता. सावली येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची उपस्थिती लाभणार ही माहिती मिळताच त्यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. स्वागत कार्यक्रमादरम्यान रणरणत्या उन्हात काळया डांबरी रस्त्यावर लेझिम वाजवून स्वागत करणाऱ्या शाळकरी मुलींच्या पायाकडे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची नजर पडताच त्यांनी त्वरित स्वागत कार्यक्रम आटोपता घेतला.

लेझिम पथकातील प्रत्येक शाळकरी मुलींना भेटून त्यांची विचारपूस करून त्यांना शाबासकीची थाप दिली. गरीब शेतकरी व कष्टकरी बापांच्या लेकी असल्याची माहिती होताच पालकमंत्र्यांनी पथकातील 14 मुलींना सात  हजार रुपये चप्पल घेण्यासाठी स्वतः कडून भेट म्हणून दिले. पालकमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा प्रत्यय गावक-यांनी यावेळी अनुभवला