रासेयो शिबिरातून व्यक्तिमत्व घडविण्याची संधी – प्राचार्य प्रमोद काटकर

विसापुरात कोरोना काळ व युवाशक्ती यावर शिबीर

विसापूर प्रतिनिधी:-राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर विद्यार्थ्यांसाठी सामाजिक भान जपणारे असते. ग्रामीण संस्कृतीसोबत नाळ जोडणारे आहे. युवा वर्गात व्यक्तिमत्व घडविण्याची संधी निर्माण करणारे असते. युवा पिढीला घडविण्यास हातभार लावणारे आहे. सामाजिक जाणीव करून देणारे आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त लाभ घ्यावा, असे प्रतिपादन चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. प्रमोद काटकर यांनी विसापूर येथे केले.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सरदार पटेल महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्राचा अमृत मोहोत्सव वर्षाचे औचित्य साधून ” कोरोना काळ आणि युवाशक्ती ” यावर राष्ट्रीय सेवा योजना शिबीर आयोजित केले आहे. १५ मार्च पर्यंत चालणाऱ्या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून प्राचार्य प्रमोद काटकर बोलत होते.

शिबिराचे उदघाटन सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाँ. प्रमोद काटकर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाँ. स्वप्नील माधमशेट्टीवार, विसापूरच्या सरपंच वर्षा कुळमेथे, पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम,ग्रामपंचायत सदस्य विद्या देवाळकर, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, हर्षला टोंगे, शशिकला जिवने, सुरज टोमटे, गजानन पाटणकर यांची उपस्थिती होती.

विसापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीर दरम्यान कौशल्य विकास व रोजगार, सायबर सुरक्षा, स्त्री पुरुष समानता, पर्यावरणाचा ऱ्हास, मतदान माझा अधिकार, कोरोना काळातील शारीरिक व मानसिक आरोग्य आदी विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी अनेकश्वर मेश्राम, प्रशांत पोटदुखे, विद्या देवाळकर, सुरज टोमटे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना शिबीर समन्वयक डाँ. उषा खंडाळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रम अधिकारी डाँ. कुलदीप गोंड यांनी तर आभार डाँ. निखिल देशमुख यांनी मानले.