ग्रामस्थांची भरगच्च उपस्थिती, पण ग्राम सभा रद्द

सरकारी दारू दुकानाला हवी होती मान्यता

पोलीस प्रशासन बनली मुकदर्शक

विसापूर प्रतिनिधी:- बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विसापूर ग्रामपंचायत ने पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजता ग्राम सभा आयोजित केली. ग्रामसभेत गावात सरकार मान्य देशी दारू दुकानाला मान्यता देण्यासाठी व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती आणि वनाहक्क गाव समितीचे गठन करण्यासंदर्भात ग्रामसभेत निर्णय घेण्याचे योजिले होते. सभेला भरगच्च ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली. मात्र दारू दुकान परवानगी देण्यावरून गावातील अवैध दारू विक्रेत्यांनी व त्याच्या समर्थकांनी सभेत गोंधळ घातला. यावेळी मात्र बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील व त्यांच्या पथकाने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने व ग्रामविकास अधिकारी यांचेवर दबाव टाकून ग्रामसभा घेण्यास मज्जाव केल्याने ग्रामसभा रद्द करण्यांची नामुष्की विसापूर ग्रामपंचायत वर आली. यामुळे गावाकऱ्यात संताप व्यक्त केला जात आहे.

मागील काही वर्षांपासून विसापूर ग्रामपंचायत हद्दीत सरकार मान्य देशी दारू दुकान बंद आहे. त्यामुळे येथील सरकार मान्य देशी दारू विक्रेत्यांनी आपआपली दुकाने अन्यत्र हलवली. तेव्हापासून विसापूर गावात अवैध दारू विक्रेत्यांनी गावात बस्तान मांडले. परिणामी गावात गुंडप्रवृत्ती वाढली आहे. यावर तोडगा म्हणून ग्रामपंचायत ने गावात सरकार मान्य देशी दारू दुकान सुरु व्हावे, यासाठी प्रयत्न चालविला आहे. सर्वसामान्य व मेहनती काम करणाऱ्याना अवैध दारू विक्री मुळे आर्थिक भार सहन करावा लागत आहे. यामुळे दारू पिणाऱ्याचा आर्थिक भार कमी व्हावा. गावातील अवैध दारू विक्रेत्यांची मुजोरी कमी व्हावी. ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होण्याच्या अनुषंगाने गावात सरकार मान्य देशी दारू दुकान सुरु करण्यासाठी हालचाल केली. त्यामुळे आपला अवैध दारू व्यवसाय बंद होणार म्हणून त्यांनी ग्रामसभेत चांगलाच गोंधळ घातला.

ग्राम सभेत आरडाओरड सुरु असताना पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका करत होते. यावर ग्रामसभेला उपस्थिती ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. उलट पक्षी ग्रामपंचायतीला तुम्ही नीट व्यवस्था केली नाही, म्हणून अवैध दारू विक्रेत्यांचे समर्थन करत असल्याचे दिसून आले. परिणामी ग्रामपंचायतीला ग्रामस्थानाची भरगच्च उपस्थिती होऊनही ग्रामसभा रद्द करण्याची नामुष्की आली.