महसूल कर्मचारी संघटनेचा ४ एप्रिल पासून संपाचा इशारा

राज्यभर केले जाणार आंदोलन

अव्व्ल कारकून व मंडळ अधिकारी पदोन्नतीची मागणी

विसापूर ( चंद्रपूर ):- महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने येत्या ४ एप्रिल पासून बेमुदत संपाचा सरकारला इशारा दिला आहे. अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती देण्यात यावी व अन्य न्याय मागण्या तातडीने सोडविण्यात याव्या, अशा महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्या असून संपाचे आंदोलन राज्यभर केले जाणार असल्याचे चंद्रपूर जिल्हा राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अजय मेकलवार व सरचिटणीस मनोज आकनूरवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संपाबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार, राज्याचे मुख्य सचिव व अप्पर सचिव यांना संपाबाबत कळविण्यात आले आहे.’ नागरिकांनो क्षमस्व, आमचा नाईलाज आहे.’ अशी क्षमा मागून नागरिकांना होणाऱ्या गैरसोबद्दल आर्जव देखील केली आहे.मागील दोन वर्षांपासून राज्य सरकार कडे महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्यासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे. मात्र राज्य सरकार न्याय मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. परिणामी आंदोलनाचा मार्ग पत्कारावा लागला आहे, असे संघटनेचे उपाध्यक्ष अजय मेकलवार यांनी सांगितले.

महसूल प्रशासनात अव्वल कारकून संवर्गातील नायब तहसीलदार पदोन्नतीचे प्रस्ताव मागील दोन वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. मात्र शासनाने याकडे आजतागायत दुर्लक्ष केले आहे. यामुळे कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील महसूल विभागात महसूल सहायकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून पद भरती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एका कर्मचाऱ्याला दोन ते तीन कार्यासनाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत असल्यामुळे कर्मचारी मानसिक तणावात आले आहे. वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून देखील रिक्त पदाचा भरणा केला जात नाही. यासह अन्य मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे हत्यार पुढे करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ५०० वर कर्मचारी आंदोलनात होणार सहभागी

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २१ मार्च रोजी निदर्शन करून आंदोलन केले. याच मालिकेत २८ मार्च रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला जाणार आहे. त्यानंतर ४ एप्रिल पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील पदोन्नत नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहायक, व शिपाई संवर्गातील ५०० वर महसूल कर्मचारी सहभागी होणार असून महसूल प्रशासनातील सामान्य जनतेचे कामे प्रभावित होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र धात्रक, उपाध्यक्ष अजय मेकलवार, सरचिटणीस मनोज आकनूरवार, कार्याध्यक्ष संजना झाडे, सोनाली लांडे, अमोल आखाडे, प्रणाली खीरटकर, अमोल करपे आदी पदाधिकारी आंदोलनात सक्रिय होणार असून न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.