विसापुरातील कार्यकर्त्यांची सामाजिक बांधिलकी!

गावातील दोन कुटुंबाना दिला मदतीचा हात

लता मंगेशकरांना वाहिली खरी आदरांजली

विसापूर प्रतिनिधी :- भारताची गान कोकिळा, स्वरसाम्राजी लता मंगेशकर यांचे अलीकडे निधन झाले. गावातील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकरांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या अनुषंगाने ‘ स्वर कोकिळा ‘या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी गावातून वर्गणी जमा केली. मात्र गावात अघटित घटना घडली. एका गरीब घरच्या कमावता ह्रदयविकाराने मरण पावला. दुसरा गरीब मुलगा अपघातात गंभीर जखमी झाला. या ह्रदयस्पर्शी घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांचे मन द्रवले. संगीतमय रजनी कार्यक्रम रद्द केला. आपदग्रस्त दोन कुटुंबाना मदतीचा हात दिला. विसापुरातील सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे यामुळे कौतुक केले जात आहे.

विसापूर येथील राजू नथ्यु आंबीलकर (४६) याचे अकाली ह्रदयविकाराने निधन झाले. घरची परिस्थिती जेमतेम होती. यामुळे कुटुंबावर आघात कोसळला. सामाजिक बांधिलकीतून मदत करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. संगीतमय रजनी कार्यक्रमासाठी जमा झालेली काही रक्कम त्याच्या कुटुंबाला मदत म्हणून दिली. येथील वार्ड पाच मधिल प्रवीण मशाखेत्री या तरुणाचा कोठारी – बल्लारपूर मार्गांवर येनबोडी जवळ अपघात झाला. आई वडिलांची गरिबीची परिस्थिती. मुलावर उपचारासाठी खर्च करणे, अवघड जात होते. यामुळे माणुसकी गहीवरली. त्या कुटुंबाला मदत देण्याचा कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. सामाजिक बांधिलकी जोपासून गरजूना मदतीचा हात दिल्यामुळे त्या कुटुंबाना मोठा आधार मिळाला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आपदग्रस्त कुटुंबाना दिलासा मिळाल्याने, सामाजिक कार्यकर्त्यांच्या कौतुकास्पद कार्याचा गौरव केला जात आहे. खऱ्या अर्थाने गानकोकिळा लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

विसापूर येथील सुनील नाकाडे, राजेश गिरडकर, सुनील चौधरी, जनार्धन पाटणकर, गजानन बावनकुळे, वामन गौरकार, डाँ. केशव बागडे, सुरेश पंदीलवार, डाँ. अमोल बुटले, सुरेश मोगरे, रमेश करमणकर, सुनील जुनघरे, दिलीप पोहणे, योगेश्वर टोंगे आदी कार्यकर्त्यांच्या सामाजिक कार्याचे गावात कौतुक केले जात आहे.