महसूल कर्मचाऱ्यांच्या लाक्षणिक संपाला शतप्रतिशत प्रतिसाद

१५ तालुक्यातील नागरिकांचे कामे प्रभावित

न्याय मागण्यासाठी सरकारचे वेधले लक्ष

विसापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एका दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. या संपाला जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन संप शतप्रतिशत यशस्वी केला. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचे कामे प्रभावित झाली.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती द्यावी, त्याच प्रमाणे अन्य न्याय मागण्या त्वरित शासनाने सोडवाव्या म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार, राज्याचे मुख्य सचिव व अप्पर सचिव यांना येत्या ४ एप्रिल पासून बेमुदत संपाची नोटीस बजावली आहे. त्याच मालिकेत आज सोमवारी सर्व १५ तहसील कार्यालयात एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला. महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी जोरदार निदर्शने करून सरकारने न्याय मागण्या मंजूर करावे. यासाठी आक्रोश केला. जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक बांधिलकीतून रक्त दान देखील केले. यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजू धांडे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र धात्रक, उपाध्यक्ष अजय मेकलवार, सरचिटणीस मनोज अकनूरवार, नितीन पाटील, महिला प्रतिनिधी प्रणाली खीरटकर, रीमा व्हेलेकर, सोनाली लांडे, अमोल आखाडे, अमोल करपे आदी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.