समूह संसाधन व्यक्तींचे ९ महिन्यांचे मानधन थकीत

मानधन द्या, अन्यथा ५ एप्रिलनंतर आंदोलन
उमेदचे मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन

अतुल कोल्हे भद्रावती:-
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध समूह संसाधन व्यक्तींचे (आयसीआरपी ) ताईंचे गेल्या 9 महिन्यापासूनचे थकीत व प्रलंबित मानधन तात्काळ देण्यात यावे.अन्यथा दि. 5 एप्रिलपासून कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा उमेद महिला कल्याणकारी मंडळाच्या जिल्हास्तरीय समन्वय समिती चंद्रपूर द्वारा मुख्य समन्वयक शिल्पा भोस्कर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाद्वारे मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणाचे काम अधिक प्रभावीपणे होण्याकरिता गावस्तरावर विविध संसाधन व्यक्ती त्याप्रमाणे विविध कॅडरची नेमणूक करण्यात आली आहे. या व्यक्ती गावस्तरापासून संपूर्ण समर्पित व संवेदनशील भावनेतून आपले कार्य पार पाडीत आहे. परंतु मागील 9 महिन्यांपासून मानधन देण्यात आले नसून मानधन अदा करण्याची तरतूदही अद्यापही केली गेली नाही.आम्हास मुले-बाळे व परिवार असून आम्ही जगायचे तरी कसे असा प्रश्न आमचे समोर निर्माण झाला आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

त्यांनी या निवेदनात मानधन हे ग्रामसंघात न टाकता वयक्तिक बँक खात्यात कपात न करता पूर्ण जमा करावे, कॅडरसाठी ऑनलाईन कामाकरिता प्रत्येकाला भ्रमणध्वनी संच व रिचार्ज रक्कम द्यावी,समूह संसाधन मानधनात वाढ करून ती 10 हजार रुपये करण्यात यावी.याशिवाय अन्य मागण्यांचा समावेश आहे.तत्पूर्वी अनेकदा निवेदने देऊन देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. दि.5 एप्रिल पर्यंत मानधन दिले गेले नाही तर कामबंद आंदोलन पुकारून पंचायत समिती स्तरावर उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून केला आहे.

निवेदनाची एक प्रत भद्रावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार यांना देण्यात आली आहे. यावेळी पंचशीला कांबळे,स्वागता सावसकडे,मेघा आवारी,शिला साळवे,शालिनी केदार,उषा कोलते,रसिका लभाने, नूतन दडमल,लता माहूरे,वैशाली आगलावे शिवाय उमेदच्या 92 महिलांचा समावेश होता.