महसूल विभागात राज्यातील २२ हजारावर कर्मचारी बेमुदत संपावर

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यातील ४०७ कर्मचारांच्या सहभाग

विसापूर ( चंद्रपूर )- राज्य शासनाच्या महसूल विभागात अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती देण्यात यावी, आणि अन्य न्याय मागण्या मागील दोन वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहेत. मात्र शासन न्याय मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवार पासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे राज्य भरातील जवळपास २२ हजारावर व चंद्रपूर जिल्यातील ४०७ महसूल कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाची झळ मात्र सामान्य नागरिकांना बसली आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने २१ फेब्रुवारी २०२२ रोजी बेमुदत संप व आंदोलन करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार, राज्याचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव यांना निवेदन सादर करून अवगत केले होते. त्यानंतर २१ मार्चला निदर्शने,२३ ला काळ्या फिती लावून काम करणे,२८ मार्चला एक दिवसाचा लाक्षणिक संप करून बेमुदत संपाचा इशारा दिला. मात्र राज्य शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे कानाडोळा केला. परिणामी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवार पासून बेमुदत संपाचे हत्यार पुढे केले आहे, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजू धांडे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र धात्रक व उपाध्यक्ष अजय मेकलवार यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवा भरती मान्य केली. मात्र याबाबत अद्याप शासन निर्णय निर्गमित केला नाही. महसूल विभागात महसूल सहायकाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. परंतु रिक्त पदाचा भरणा केला जात नाही. महसूल कर्मचाऱ्यांची सुधारित निकषानुसार पदोन्नती केली जात नाही.नायब तहसीलदार यांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला. मात्र ग्रेड पे वर्ग ३ नुसार देऊन अन्याय केला आहे. महसूल कर्मचारी वर्गाच्या हितासाठी दांगट समितीचा अहवाल प्रसिद्ध करावा. संजय गांधी योजना, रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत निवडणूक शाखा, नैसर्गिक आपत्ती, गौण खनीज आदी बाबत नव्याने आकृतिबंध तयार करून कर्मचारी भरती प्रक्रिया करावी. महसूल विभागात कित्येक वर्षांपासून अस्थायी पद भरतीला कायम करावे. पात्र चतुर्थ श्रीणी कर्मचाऱ्यांना वर्ग ३ मधून पदोन्नती द्यावी. आदी मागण्या दोन वर्षांपूर्वी पासून शासनाकडे प्रलंबित आहे. मात्र आश्वासनापलीकडे काही केले नाही. याचा असंतोष महसूल कर्मचाऱ्यात आहे. शासनाने न्याय मागण्या त्वरित निकाली काढाव्या म्हणून बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे, असे अजय मेकलवार यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे नेतृत्व विभागीय अध्यक्ष राजू धांडे, जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र धात्रक, उपाध्यक्ष अजय मेकलवार, सरचिटणीस मनोज आकनूरवार, नितीन पाटील, प्रणाली खीरटकर, रिना व्हेळेकर, संजना झाडे, सोनाली लांडे, अमोल करपे, अजय गाडगे, सुनील चांदेवार, हेमंत उपरे आदीच्या सहभागाने केले जात आहे.

महसूल कर्मचारी संघटनेच्या न्याय मागण्या मागील दोन वर्षांपूर्वी पासून शासन दरबारी प्रलंबित आहे. आम्ही संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी सरकार कडे समस्याचा पाढा वाचला. परंतु आमच्या न्याय मागण्या अद्याप सोडविण्यात आल्या नाही. नागरिकांनो क्षमस्व! आमचा नाईलाज आहे!, अशी क्षमा मागून राज्य बेमुदत संप पुकारला आहे. राज्यभरातील जवळपास २२ हजारावर महसूल कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्यातील ५०० च्या आसपास कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
– राजू धांडे
विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना. “