महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाला शासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत

महसूल कर्मचारी संघटनेचा आरोप
बेमुदत संपाच्या तिसऱ्या दिवशी आक्रमक

विसापूर (प्रतिनिधी) : राज्य शासनाचे महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. झोपेत असलेल्या शासनाला जागे करण्यासाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले. मात्र महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला राज्य शासनाचे महसूल प्रशासन कारणीभूत आहे. असा पवित्रा घेत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना आता आक्रमक झाली आहे. बेमुदत संप तिसऱ्या दिवशी देखील सुरू असून आरपारची लढाई लढण्याच्या मनोदय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल विभागातील कार्यरत अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती द्यावी व अन्य न्याय मागण्यासाठी सोमवार पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे राज्यभरातील महसूल प्रशासनातील नागरिकांचे कामे प्रभावित झाले आहे. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून संपाच्या तिसऱ्या दिवशी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी पासून प्रलंबित मागण्या शासनाने सोडविण्यात याव्यात म्हणून बेमुदत संप केला जात आहे. अनेकदा पाठपुरावा करून देखील मागण्या मान्य करण्यात आल्या नाही. यामुळे महसूल कर्मचारी संघटनेत असंतोष आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार ( दि.४) पासून राज्य शासनाला बेमुदत संपाबाबत अवगत केले. मात्र शासनाने आजतागायत महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकडे कानाडोळा केला. आता मात्र कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेमुदत संप तीव्र करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक तालुकास्तरावर संपाला गतिमान करण्यासाठी नियोजन केले आहे. राज्य सरकारने सप्टेंबर २०१९ रोजी नायब तहसीलदार संवर्गासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया मान्य केली आहे. मात्र शासन जाणीवपूर्वक शासन निर्णय काढत नाही. महसूल विभागात रिक्त पदाचा भरणा करत नाही. महसूल कर्मचाऱ्यांची सुधारित निकषानुसार पदोन्नती करत नाही. महसूल कर्मचाऱ्यांच्या हिताचा दांगट समितीचा अहवाल प्रसिद्ध करत नाही. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केले जात आहे. यामुळे महसूल कर्मचाऱ्यात मोठा असंतोष आहे. यावर शासनाने त्वरित निर्णय घेऊन महसूल कर्मचारी संघटनेच्या न्याय मागण्या सोडविण्यासाठी बेमुदत संप केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या संपाची धार चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुक्यात तीव्र झाली असून बेमुदत संपाला अन्य कर्मचारी संघटनेनी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजू धांडे, जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र धात्रक, उपाध्यक्ष अजय मेकलवार, सरचिटणीस मनोज आकनूरवार, नितीन पाटील प्रणाली खीरटकर, रिना वेल्हेकर, संजना झाडे, सोनाली लांडे, अमोल करपे, अजय गाडगे, राकेश जांभुळकर, सुनील चांदेवार विष्णू नागरे, हेमंत उपरे आदी पदाधिकाऱ्यांनी न्याय मागण्यासाठी आरपारची लढाई लढण्याचा मनोदय वक्त केला आहे.