विसापूर शेतशिवारात वाघाची दहशत

शेतकऱ्यांच्या जनावरावर हल्ला
वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी

विसापूर  (प्रतिनिधी) : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर वर्धा नदीकडील भागात आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला आहे. शेतशिवारात जनावरावर हल्ला करून ताव मारत आहे. यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बल्लारपूर वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, असी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आजघडीला विसापूर येथील शेतकरी वाघाच्या दहशतीत आहे.

उन्हाळा लागला असून वन्य प्राणी पाण्याच्या व भक्षाच्या शोधार्थ भटकंती करत मागील आठवड्यापासून वाघाने विसापूर शेतशिवारात धुमाकूळ घातला आहे.रविवारी नरेंद्र इटणकर यांच्या गोऱ्यावर झडप घालून जखमी केले. त्या घटनेची शाई वाळत नाही, तर आज शुक्रवारी चंद्रशेखर टोंगे यांच्या वासरावर हल्ला केला. यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. दिवसेंदिवस जनावरावर वाघाच्या हल्ल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.विसापूर शेतशिवारात वावरत असलेल्या वाघाचा बंदोबस्त करावा, म्हणून शेतकऱ्यांनी वन विभागाचे दार ठोटावले आहे.

बल्लारपूर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून वाघाला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.