विसापुरात भजन व कीर्तनातून श्रीराम जन्मोत्सव साजरा

विसापूर (प्रतिनिधी) : येथील नागराज गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या वतीने श्रीराम चौकात प्रभू श्रीराम जन्मोत्सव भजन व कीर्तन सादर करून साजरा करण्यात आला. यावेळी श्रीराम नवमी जन्म उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि समाज बांधवांनी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा लाभ घेतला.
विसापूर येथील नागराज गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गायक कलावतांनी गीतरामायण व रामकथा सादर करून दशरथ, कौसल्या, कैकयी, राम -सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान,आदींचा महिमा गाऊन रामायणातील प्रसंगाना उजाळा दिला.मानवी जन्म लाभलेल्या, विष्णुचा अंश असलेल्या श्रीरामाच्या रामकथेतून ऐतिहासिक वारसा सांगून प्रबोधन केले. पिढ्यानंपिढ्या जोडणाऱ्या प्रवाहरचा गीतरामायण हा मनामनात जोडणारा रामसेतू आहे. हा रामसेतू जोडून समाजात बंधूभाव जोपासण्याचा संदेश भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून देण्यात आला.

गीत रामायण कार्यक्रमाला नागराज गुरुदेव सेवा भजन मंडळाचे विनायक चौधरी यांनी हार्मोनियमवर, उद्धव गिरसावळे यांनी तबल्यावर,नागोबा ढवस, सूर्यकांत मडावी, सुधाकर पिंपळकर, बाळू कुळमेथे, मधुकर सिडाम यांनी गीतरामायण कार्यक्रमाला उत्कृष्ट साथसंगत केली.गीत रामायण व रामकथा कार्यक्रम मनामनांना जोडणारा सेतू ठरल्याची भावना रामभक्तांनी वक्त केली.