शाळा ही बालसंस्कार करणारे केंद्र ठरावे : अंकेश्वर मेश्राम

जिल्हा परिषद शाळा प्रवेश मेळावा 

विसापूर (प्रतिनिधी) :  कोरोना काळाने बालमन कोमोजल्यागत झाले. बालमन संस्कारमय घडविण्याची जबाबदारी शिक्षक व पालकांवर आहे. शाळा हेच यासाठी प्रभावी माध्यम आहे. शालेय शिक्षण विभाग यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषद शाळेनी ही भूमिका पार पाडावी. शाळा ही बालमनावर संस्कार करणारे केंद्र ठरावे, असे प्रतिपादन उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी विसापूर येथे केले.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत बुधवारी शाळा प्रवेश मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल खनके होते. शाळा प्रवेश मेळाव्याचे उदघाटन उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य महेश तुराणकर, शंभा गेडाम, श्रुतिका गिरडकर, ललिता पाटणकर, संगीता गेडाम, राज्यश्री परसूटकर, मुख्याध्यापक वर्षा जीवणे, शिक्षक पंचशीला मांडवे, विलास कुळसंगे यांची उपस्थिती होती.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण करून व फीत कापून शाळा प्रवेश मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी जि. प. शाळेत नव्याने पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे पुष्प प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी शारदा डाहुले यांनी मनोगतातून शाळा ही भावी पिढी घडविणारी आहे. शिक्षकांनी ही पिढी घडविताना चांगले संस्कार करून सुसंस्कृत करावे, असे सांगितले. अमोल खनके यांनी जिल्हा परिषद शाळा आजघडीला मागे नाही. मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य उज्वल करणारे असून पालकांनी जि. प. शाळेची कास धरावी, असे मार्गदर्शन करताना सांगितले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक वर्षा जीवणे यांनी केले. संचालन पंचशीला मांडवे यांनी तर आभार विलास कुळसंगे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.