राजोलीतील अवैध दारूकिंग मल्लेशची अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करा

आदर्श ग्रामपंचायत राजोली येथील महिलांची मागणी

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील राजोली येथे मोठया प्रमाणावर अवैध दारूविक्री सुरू आहे मात्र पोलीस प्रशासन किंवा स्थानिक पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अवैध दारूबंद करण्यासाठी ठोस पाउल उचल नसल्याने आदर्श ग्राम पंचायत असलेल्या राजोली येथील महिलांनी एकच टाहो फोडला असुन मल्लेशची अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली.

चंद्रपूर जिल्हयात मागील वर्षापर्यंत दारूबंदी होती, याकाळातही राजोली येथे काही प्रमाणात अवैध दारूविक्री सुरूच होती, महाविकास आघाडी सरकारने जिल्हयातील दारूबंदी हटवुन सरकारमान्य दारूविक्री सुरू करण्यास परवानगी देण्यात आली, परंतु मूल तालुक्यातील आदर्श ग्राम पंचायत असलेल्या राजोली येथील अवैध दारूविक्री अजुनही बंद झालेली नाही, यामुळे राजोलीतील दारूमुळे त्रस्त झालेल्या, महिलांनी सरपंच जितेंद्र लोणारे यांच्या घराजवळ एकत्र येत ‘‘मल्लेश’’ची अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी रेटुन धरली. महिलांनी रोद्ररूप धारण केल्याने राजोलीचे सरपंच जितेंद्र लोणारे, पोलीस पाटील गोपाल ठिकरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बालु पेशट्टीवार यांनी पोलीसांना पाचारण केले, मूलचे पोलीस याठिकाणी रात्रौ पोहोचल्यानंतर महिलांना अवैध दारूविक्री बंद करण्याचे आश्वासन दिल्याने  महिलांनी समाधान व्यक्त केले. 

राजोली येथील अवैध दारूविक्री बंद : शाम पेशट्टीवार

अवैध दारूविक्री करणाऱ्यांना समज दिली असुन सध्या राजोलीतील अवैध दारूविक्री बंद आहे अशी प्रतिक्रिया राजोली येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शाम पेशट्टीवार यांनी दे धक्काशी बोलतांना दिली