तुकाराम सेवा मंडळाची सामाजिक बांधिलकी, आपदग्रस्ताला मिळाला मोठा दिलासा

 कॅन्सरग्रस्त कुटुंबाला दिला मदतीचा हात

विसापूर (प्रतिनिधी) : घरातील परिस्थिती बेताची. अशातच पत्नीला कॅन्सर आजार असल्याचे निदान झाले. आपल्या पत्नीला आजारातून मुक्त करण्यासाठी धडपड केली. सर्व दवाखाने पालते घातले. मात्र आजाराने साथ सोडली नाही. जवळचा पैसा अदला पूर्ण खर्च झाला. तरीही पत्नीला आजारातून बरे करण्यासाठी त्याची धडपड सुरु होती. अशातच बल्लारपूर येथील श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ त्याच्या मदतीला धावून आले. तेथील पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून आर्थिक मदतीचा हात दिला. त्यामुळे त्या आपदग्रस्त कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. यामुळे संत तुकाराम महाराज सेवा मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मानवी जीवनात जन्म – मरणाचा फेरा कोणालाच चुकला नाही. हाच जीवन संघर्ष आहे. हा जीवन संघर्ष बल्लारपूर येथील मनोहर पिंपळकर यांच्या जीवनात आला. पत्नीला कॅन्सर आजार असल्याचे उपचारादरम्यान निष्पन्न झाले. त्यामुळे कुटुंबाचे अवसान गळाले. कुटुंबियांनी तिला आजारमुक्त करण्यासाठी सारे प्रयत्न केले. उपचारादरम्यान घरातील सारी गंगाजळ आटली. दुष्काळात तेरावा महिना आला. मात्र मनोहर ची पत्नीला आजारातून बरी करण्याची केविलवानी धडपड सुरूच होती. याच अनुषंगाने त्यांनी श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळाकडे अर्ज सादर करून मदतीचा हात मागितला.

संत तुकाराम सेवा संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्ती पी. यु. जरीले यांचे मन द्रवले. त्यांनी संस्थेच्या अन्य पदाधिकारी प्रा. एम. यु. बोडे, प्राचार्य आर. एन. खाडे, मनोहर माडेकर, विनायक साळवे, संजय लाडे, प्रदीप मोरे, पुरुषोत्तम पोटे आदीच्या समक्ष कॅन्सर ग्रस्ताला मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्वांनी सामूहिक निर्णय घेऊन मनोहर पिंपळकर यांच्या पत्नीच्या उपचारासाठी मदत देण्याचे मान्य केले. सर्व सोपास्कार करून काही रक्कम व मदतीचा धनादेश आपदग्रस्त कुटुंबाला देण्यात आला. संत तुकाराम महाराज सेवा मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या मदतीच्या हातभारामुळे मनोहर पिंपळकर यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. बल्लारपूर येथील तुकाराम महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष पी. यु. जरीले व पदाधिकारी कार्यकारिणीचे सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.