समाज कल्याण योजनाची प्रभाविपणे अंमलबजावणी करा : मान्यवरांचे मार्गदर्शन

महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

विसापूर (प्रतिनिधी) : समाज कल्याण विभागाच्या विविध लोकांभीमुख योजना आहेत. या योजना अनुसूचित जाती समुहाचे जीवनमान उंचावण्यास उपयोगी आहे. सदर योजनाची प्रभाविपणे अंमलबजावणी स्थानिक ग्रामपंचायतीने करावी, असे मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण विभागाच्या पर्यवेक्षकांनी ही माहिती दिली.

विसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त ६२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मुनी समाज भवन येथे मार्गदर्शन कार्यक्रम रविवारी पार पडला. याप्रसंगी सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध योजनाची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, सुनील रोंगे, गजानन पाटणकर, संदीप काकडे, दिलदार जयकर, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, हर्षला टोंगे, शशिकला जीवने, विद्या देवाळकर, ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते, लिपिक संतोष निपुंगे, समाज कल्याण विभागाचे पर्यवेक्षक आर. एन. कुसराम, डी. जी. चौहान, बबिता हुमणे यांची उपस्थिती होती.

तत्पूर्वी सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रध्वजाला मानवदंना देण्यात आली. दरम्यान समाज कल्याण विभागाचे पर्यवेक्षक डी. जी. चौहान, आर. एन. कुसराम, बबिता हुमणे यांनी समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जातीच्या लाभाच्या योजना भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई घरकुल योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप योजना, मुला -मुलींसाठी शासकीय वसतिगृह, युवकांसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना, बचत गटाना मिनी ट्रॅक्टर वाटप योजना, सामूहिक विवाहासाठी कन्यादान योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना व आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन आर्थिक सहाय योजनाची माहिती उपस्थितीतांना दिली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्यांना समाज कल्याण योजनाचे माहिती पत्रक देण्यात येऊन योजनेची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात अवगत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन लिपिक संतोष निपुंगे यांनी केले. आभार उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी मानले.