वैरण लागवड योजना ग्रामीण विकासासाठी वरदान ठरेल : आमदार प्रतिभाताई धानोरकर

चंद्रपूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महिलांच्या हातात कारभार असणे गरजेचे आहे. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिलांच्या हातात आर्थिक गाडा आला आहे. अशाच प्रकारे समुदाय विकासासाठी वैरण लागवड हि योजना ग्रामीण विकासासाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. त्या वरोरा तालुक्यातील परसोडा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वरोरा तालुक्यातील परसोडा येथे नाविन्यपूर्ण समुदाय विकासासाठी वैरण लागवड उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.

याप्रसंगी जिल्हा परिषद चंद्रपूर उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, गटविकास अधिकारी राजेश राठोड, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय वानखेडे, पशुधन अधिकारी डॉ. नेव्हारे, पशुधन विकास अधिकारी डॉ. आगरते, मिलिंद भोयर, संदीप दाडमल, राजू चिकटे, तसेच उमेद सेलचे अधिकारी, पंचायत समिती वरोरा येथील अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांची उपस्थिती होती.

वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील महिलांच्या सर्वागीण विकास होण्याकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम आणण्यासाठी प्रयत्न नेहमी करीत असते. या भागातील महिलांना शासकीय योजनांच्या लाभ मिळण्यासाठी त्या नेहमी आग्रही असतात. त्यासोबतच उमेद मधील महिलांना अनेक महिन्यापासून वेतन मिळत नव्हते ते देखील मिळण्याकरिता पाठपुरावा करून ते तात्काळ देण्यात आले. आता देखील ग्रामीण भागात शेती सोबत पूरक व्यवसाय येथील महिलांना मिळण्यासाठी समुदाय विकासासाठी वैरण लागवड हा नाविन्यपूर्ण प्रयोग सुरु करण्यात आला. या माध्यमातून या विधानसभेतील महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी महिलांना मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याची सांगितले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.