मनरेगातून ३६ कोटींचा विकास आराखडा : समृद्ध गावाची संकल्पना करणार साकार

बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली ग्रामपंचायतीचा होणार कायापालट

विसापूर  (प्रतिनिधी)  : बल्लारपूर तालुक्यात शेवटच्या टोकावर गिलबिली आदिवासी बहुल गाव आहे. यामध्ये गिलबिली, आसेगाव, मोहाडी गावाचा समावेश आहे. येथील गावाकऱ्यांनी ‘ मी समृद्ध तर माझा गाव समृद्ध ‘ ही संकल्पना प्रत्यक्ष साकारण्याचा संकल्प केला आहे. याला बल्लारपूर चे तहसीलदार संजय राईचंवार व गट विकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांचे व त्यांच्या मनरेगा पथकाचे सहकार्य मिळत आहे. याच अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ३६ कोटी रुपये किंमतीचा विकास आराखडा तयार केला आहे. यामुळे बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली ग्रामपंचायतीचा आगामी दहा वर्षात कायापालट होणार आहे.

बल्लारपूर तहसील प्रशासन व पंचायत समिती स्तरावर दशवार्षिक विकास आराखडा तयार करून गिलबिली ग्रामपंचायत व त्या अंतर्गत असलेल्या आसेगाव व मोहाडी गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार ९ ते १२ मे दरम्यान विकास आराखडा केला. तब्बल ३६ कोटी रुपये किंमतीचा आराखडा ग्रामपंचायत सरपंच गोपिका बुरांडे यांच्याकडे नुकताच सादर केला. मनरेगाच्या माध्यमातून सादर केलेल्या विकास आराखड्यामुळे गावातील शेतकरी, भूमिहीन, मजूर व व्यवसायिक कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. गावाच्या विकासाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जाणार आहे. मनरेगा पथकाने गावात प्रत्यक्ष गृहभेटी घेऊन कुटुंबाचे सर्वेक्षण केले. यामुळे गरजेनुसार व पात्रतेनुसार वैयक्तिक कामाच्या लाभाची नोंद घेणे सोपे झाले.

गिलबिली ग्रामपंचायत मधील तीनही गावात शिवार फेरी च्या माध्यमातून जणजागृती केली. यामुळे गावातील शिवार, जंगल तलाव, नाले, शेती, शेत रस्ते, शाळा, अंगणवाडी, गावातील अंतर्गत रस्ते, मूलभूत सुविधा आदी सार्वजनिक स्वरूपाच्या कामाचा समावेश दशवार्षिक आराखड्यात करण्यात आला आहे.
‘ मी समृद्ध तर माझा गाव समृद्ध ‘ही संकल्पना प्रत्येक्षात साकारण्यासाठी व लोकसहभाग मिळविण्यासाठी मनरेगाचे अमोल आभारे राजुरा, सुरज खोडे भद्रावती, अंकुश उराडे पोंभुर्णा, नरेगा कार्यक्रम अधिकारी रविकुमार बोगावार बल्लारपूर, गिलबिल सरपंच गोपिका बुरांडे, उपसरपंच बळीराम मेश्राम, ग्रामसेवक नंदेश्वर,पी. एस. सुरपाम, मोरेश्वर सत्रे, अनिल दयालवार, साईनाथ टेकाम, आकाश रायपुरे, सुभाष तेलतुंबळे, दिपक मडावी आदींचे पथक तहसीलदार संजय राईचंवार, गट विकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांना सहकार्य करत आहे.

मी समृद्ध तर माझा गाव समृद्ध, माझा गाव समृद्ध तर मी समृद्ध ” या संकल्पनेवर आधारित गिलबिली ग्रामपंचायत मधील गिलबिली, आसेगाव व मोहाडी या गावाच्या विकासाचा ३६ कोटी रुपये किंमतीचा दशवार्षिक आराखडा तयार केला आहे. या माध्यमातून सार्वजनिक व वैयक्तिक स्वरूपाची कामे मनरेगाच्या नियोजनात घेण्यात आली आहे. मनरेगामुळे गावाचा कायापालट होऊन गावापातळीवर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी लोकसंहभाग महत्वाचा घटक आहे.
-रविकुमार बोगावार
सहायक कार्यक्रम अधिकारी, बल्लारपूर.