बल्लारपूर पेपर मिलच्या आगाराची राखरांगोळी : १४ तासानंतर आगीवर नियंत्रण

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
कळमना येथील पेट्रोल पंप देखील आगीच्या भक्षस्थानी
आगीचे लोळ कमी, पण कोळसा धूमश्यतच

विसापूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर शहरापासून ५ कि. मी. अंतरावर असलेल्या कळमना येथील बल्लारपूर पेपर मिलच्या बांबू व लाकूड साठवणूक आगाराला काल रविवारी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. या आगीत आगारातील संपूर्ण साठवणूक केलेल्या बांबू व लाकडाची राखरांगोळी झाली. तब्बल २५ अग्निशमन दलाच्या पथकाने १४ तासाच्या अविरत प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र कोळसा अजुनही धूमश्यात आहे. या आगीच्या भक्षस्थानी जवळ असलेला पेट्रोल पंप देखील आला. या आगीत जीव हानी झाली नाही, परंतु वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली. आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

बल्लारपूर पेपर मिल उद्योग जागतिक दर्जाचा आहे. या उद्योगातून उत्कृष्ट कागद निर्मिती होते. या उद्योगाला लागणारा कच्चा माल म्हणून बांबू व निलगिरी लाकडाचा उपयोग केला जातो. याच कच्च्या मालाचे साठवणूक आगार बल्लारपूर तालुक्यातील कळमना गावाजवळ आहे. याच आगाराला काल रविवारी दुपारी ३ वाजता सुमारास अचानक आग लागली. या आगीत अंदाजे हजार ते दीड हजार ट्रक वाहतूक केलेला बांबू व लाकडाचा आगीच्या रौद्ररूपाने संपूर्ण कोळसा झाला. यामुळे बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाला कोट्यावधी रुपयांचे नुकसानीला सामोरे जावे लागले.

कळमना येथील रविवारी लागलेली आग सोमवारी दुपारी १२ वाजता नियंत्रणात आली. मात्र आग धूमश्यात असून आगीची झळ कळमना येथील गावाकऱ्यांना बसू नये, म्हणून तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन, वन विभाग प्रशासन लक्ष ठेऊन होते. तहसीलदार संजय राईचंवार कळमना येथे तळ ठोकून आहेत. सोमवारी रात्री पर्यंत संपूर्ण आग आटोक्यात येईल, असे तहसीलदार संजय राईचंवार यांनी सांगितले.

मध्यरात्री जिल्हाधिकारी यांची घटना स्थळी भेट
बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील बांबू डेपोला भीषण आग लागली. शर्थीचे प्रयत्न करून देखील आग नियंत्रणात येत नव्हती. सुरुवातीला पाच अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र सारे प्रयत्न निष्फळ ठरले. आगीने रौद्र रूप धारण केले. रविवारी मध्यरात्री जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपचे जेष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, तहसीलदार संजय राईचंवार यांनी आगीची भीषणता प्रत्यक्ष अनुभवली. कळमना येथील नागरिकांना आगीची झळ पोहचू नये, म्हणून उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले. त्यांच्या निर्देशांमुळे तहसील प्रशासन सोमवारी कार्यरत होते.

पेट्रोल पंप आगीच्या भक्षस्थानी
कळमना बांबू डेपो जवळ चंद्रपूर येथील व्यवसायिक महेंद्र फुलझेले यांचा भारत पेट्रोल पंप होता. बांबू आगारातील आगीने हा पेट्रोल पंप कवेत घेतला. मात्र पेट्रोल पंपाचा स्फोट न झाल्याने कलमना गाव सुरक्षित राहिले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल १३०० लिटर तर डिझेल १५५० लिटर साठा होता. पेट्रोल पंपाचा स्फ़ोट झाला नाही, असे तहसीलदार संजय राईचंवार यांनी सांगितले. मात्र पेट्रोल पंप चालकाचे भीषण आगीमुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

बिल्ट व्यवस्थापनाची कोट्यावधी रुपयांचे नुकसान
बल्लारपूर पेपर उद्योगाला लागणारा कच्चा माल आगीत भस्मसात झाला. याचा परिणाम उद्पादणावर होणार आहे. परिणामी पेपर मिल व्यवस्थापन हवालदिल झाले आहे. लाखो टन बांबू व लाकडाचा कोळसा झाला. अचानक लागलेल्या आगीने संपूर्ण डेपोतील कच्च्या मालाची राखरांगोळी झाली. वाहतूक करून ठेवलेला व पावसाळ्यात कामी येणारा बांबू व लाकूड उत्पादन वाढीस सहायभूत ठरणारा कच्चा मालाचा कोळसा झाल्याने पेपर मिल उद्योगाचे अवसान गळाले आहे. अधिकृत नुकसानीचा अद्याप आकडा आला नाही. परंतु बिल्ट चे नुकसान कोटीच्या घरात आहे.