सोसायटीच्या निवडणुका आटोपताच, जनतेची नजर आता बाजार समितीच्या निवडणुकीकडे

काँग्रेसचे पारडे जड, आम. मुनगंटीवाराच्या नेतृत्वातील भाजपा परिवर्तनासाठी जोर लावणार का?

मूल (प्रतिनिधी): तालुक्यातील विविध कार्यकारी, सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका पार पडल्या, अनेक सोसायटीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची नेमणुकही झालेली आहे, याच सोसायटीच्या सदस्यानी बाजार समितीच्या सहकार क्षेत्रातील उमेदवारांना मतदार करण्याचा अधिकार आहे, यामुळे आता जनतेच्या नजरा बाजार समितीच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत.

मूल तालुक्यातील बहुतांष सोसायटयावर कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे, सोसायटीच्या निवडणुकीकडे भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाहिजे त्याप्रमाणात लक्ष दिलेले नाही, यामुळे अनेक सोसायटयामध्ये भाजपाचे संचालकच दिसुन येत नाही, यामुळे यावर्षीही होणारी बाजार समितीची निवडणुक कॉंग्रेसच्या फायदयाची दिसुन येत आहे, परंतु भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत तन, मन, धनाने उतरल्यास चित्र वेगळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

क्षेत्राच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची तालुक्यात सहकार क्षेत्रावर चांगलीच पकड होती, त्यांच्या नेतृत्वात बाजार समितीवर अनेक वर्ष भाजपाची सत्ता होती, मात्र गेल्या काही वर्षापासुन भाजपाच्या हातातील बाजार समिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिह रावत यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या ताब्यात गेली. त्यांच्या कार्यकाळात स्व. संजय पाटील मारकवार, कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव राकेश रत्नावार आणि तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर यांनी बाजार समितीच्या सभापतीपदाची सुत्रे हातात घेवुन बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणावर विकासकामे केलेली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांची नाळ जुळलेल्या मूल बाजार समितीत गेल्या अनेक वर्षपासून कॉंग्रेसची सत्ता आहे. त्या सत्तेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी क्षेत्राचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे जोर लावतील काय? असा सवाल आता नागरीक करू लागले आहे.

सध्यास्थितीत बाजार समितीवर प्रशासक म्हणुन एस.एस तुपट हे कामकाज पाहात आहेत.