वाघाच्या हल्यात इसमाचा मृत्यु

तालुक्यातील वाघाच्या हल्याच्या घटनेत वाढ

आरमोरी (प्रतिनिधी): सरपण गोळा करण्यासाठी सायकलने जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना इंजेवारी येथे गुरुवारी सकाळी घडली वासुदेव मुरलीधर मेश्राम वय 45 वर्षे रा. इंजेवारी असे मृताचे नाव आहे. गेल्या महिनाभरातील आरमोरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात ठार होण्याची ही तिसरी घटना आहे.

आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी येथील वासुदेव मेश्राम हे सकाळी सायकलने इंजेवारी-सिर्शी रस्त्यालगत असलेल्या जंगलात सरपणासाठी लाकडे तोडण्यासाठी गेले होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जंगलात फरफटत नेले. ही सदर घटना इंजेवारी गावापासून अवघ्या एक ते दीड की.मी. अंतरावर घडली.

दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या एका इसमाने हे दृष्य पाहून गावात माहिती दिली. वनविभागालाही याबद्दल सांगण्यात आले. मात्र तोपर्यंत वाघाने मेश्राम यांचा बळी घेतला होता. मागील महिन्यात आरमोरीजवळील अरसोडा येथील महिला शेतकरी तसेच आरमोरी येथील एका शेतकऱ्यांचा वाघाने बळी घेतला होता. या घटनेने पुन्हा एकदा इंजेवारी परिसरात वाघाची भीती निर्माण झाली आहे.