राज्यातील 92 नगरपरिषद व चार नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्टला मतदान

19 ऑगस्ट ला होईल मतमोजणी

मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्टला मतदान होण्याची चिन्हे आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांचे पत्र पालिकांना प्राप्त झाले आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार ज्या जिल्ह्यात पर्जन्यमान कमी आहे, अशा 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडतील. त्यासाठी जिल्हाधिकारी 20 जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज वेबसाईटवर भरता येतील.

हे अर्ज 22 ते 28 जुलै या कालावधीतच सकाळी 11 ते दुपारी ३ या वेळेत स्विकारले जातील. 29 जुलै रोजी अर्जांची छाननी होऊन वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. याच तारखेला निवडणूक चिन्ह नेमून देत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान तर 19 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी केली जाणार आहे.