पुलात अडकून तीन वर्षीय मुलींचा मृत्यु

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील घटना 

गोंडपिपरी (प्रतिनिधी) : आई वडीलांसोबत नातेवाइकांकडे आलेल्या उ वर्षीय चिमुकलीचा पुलाखाली अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे घडली. सानू मंगेश चुनारकर ( वय 3 ) असे मृतक मुलीचे नाव आहे. ती मूल तालुक्यातील चिमडा येथील रहिवाशी होती. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे सानू मंगेश चुनारकर ही 3 वर्षीय चिमुकली आईवडिलांसोबत तीन दिवसांपूर्वी आली होती. जिल्ह्यात सर्वत्र मूसळधार पाऊस सुरू असल्याने तिचा आई वडिलांसमवेत विठ्ठलवाडा येथे मुक्काम होता.

संततधार पावसाने नदी, नाले, भरभरून वाहत आहेत. तसेच गावातील नाली पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. आज रविवारी घरासमोरील नालीत सानू पाय घसरून पडली. नाली तुडुंब भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर काही अंतरावर असलेल्या पुलात जाऊन अडकली. घरच्यांनी आरडाओरड करताच तिला वाचविण्यासाठी दोन युवक नालीत उतरले. तिला पुलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पुलाखाली ती बराच वेळ अडकून होती. पुलाखालून कसेबसे तिला बाहेर काढण्यात आले. मात्र तो पर्यंत ती बेशुद्ध झाली होती. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.