‘त्या’ सहा जणांचा जीव वाचवला : जीव मुठीत घेऊन काढली रात्र

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकांची कामगिरी

विसापूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर – कोलगाव वर्धा नदी वर मागील एका वर्षांपासून पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी सहा मजूर सामानाची देखभाल करण्यासाठी थांबले होते.मात्र बुधवारी अचानक वर्धा नदीचा जलस्तर वाढला. ‘ त्या ‘ सहा मजुरांनी जिवाच्या आकांताने विसापूर गावाकडे धाव घेतली. परंतु पुराच्या पाण्यामुळे विसापूर कडे येण्याचा मार्ग देखील बंद झाला. अखेर त्यांनी बुधवारची रात्र जीव मुठीत घेऊन शेतशिवारातील एका पडक्या घरात काढली. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने ‘ त्या ‘ सहा जणांचा पुरातून काढून जीव वाचवला. गुरुवारी सकाळी ७ वाजता हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर – कोलगाव दरम्यान वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम केले जात आहे.या पुलाच्या साहित्याची देखरेख करण्यासाठी विनोद पिंपळशेंडे, प्रल्हाद बारस्कार, बाबुराव मेश्राम, प्रकाश केवट, सुजान केवट व सुखीलाल केवट पुराच्या पाण्यात अडकले. याची माहिती बुधवारी रात्री ८ वाजता विसापूर येथे कळली. बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी येऊन परिस्थिती जाणून घेतली. पुरात अडकलेल्या सहाही मजुरांना ग्रामपंचायतच्या जुन्या पडक्या घरात आसरा घेण्याची मोबाईल वरून सूचना केली. याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी (पाटील ), तहसीलदार संजय राईचंवार यांना विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी दिली.मात्र बुधवारी रात्र झाल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्या सहाही जणांनी बेट सदृश काळोखात रात्र काढली.

गुरुवारी सकाळी ६ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन करून पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात व विसापूर चे माजी सरपंच बंडू गिरडकर यांच्या मदतीने सर्व सहाही पुरात अडकलेल्या मजुरांना सुरक्षित काढून त्यांचा जीव वाचविण्याची कामगिरी केली.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख विजय बुंगले व त्याच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली.