जनजागृतीसाठी लाखो रूपये खर्च करणाऱ्या पंचायत समितीच्या आवारातच मच्छर पैदास केंद्र

पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष

मूल (प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षापासुन मूल पंचायत समिती इमारत आणि परिसरातील विकासकामे सुरू आहे, यासाठी काम सुरू असतानाच कंत्राटदारांनी परिसरात मोठे खोदकाम करून ठेवलेले आहे, याठिकाणी पावसाचे पाणी साचुन असल्याने मच्छरांचे पैदास केंद्र तयार झाल्याची स्थिती याठिकाणची आहे मात्र पंचायत समिती प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे.

मूल पंचायत समितीच्या नविन इमारतीचे काम सुरू करीत असताना अनेक कामे याठिकाणी प्रस्तावित होती, येथील इमारत, नाली आणि रस्त्याचे अनेक कामे अजुनही अर्धवट आहे, याच कामाच्या वेळी कंत्राटदारानी जिल्हा परिषद लघु सिंचाई विभागाच्या कार्यालयासमोर मोठे खोदकाम करून ठेवलेले आहे, जवळपास 8 ते 10 फुट खोल आणि 12 ते 15 फुट लांब व रूंद खोदकाम करून ठेवले आहे,  मागील वर्षी आणि याही वर्षी  सदर खोदकामाची स्थिती सारखीच आहे, यामुळे काम पुर्ण करायचे नव्हते तर खोदकाम कशाला करण्यात आले असा सवाल आता उपस्थित होत असुन यामुळेच परिसरात मच्छर पैदास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाळयाच्या दरम्यान ग्रामीण भागात अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य व इतर आजार होण्याची शक्यता असते, यामुळे जनजागृती करण्यासाठी प्रशासन लाखो रूपये खर्च करीत असते मात्र मूल पंचायत समिती परिसराची अवस्था तर त्यापैक्षाही बिकट असल्याचे दिसुन येत आहे, अनेक नाल्यांचे कामेही अर्धवट स्थितीत असल्याने काही ठिकाणीच्या नाल्यामध्ये पाणी साचुन आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालुन खोदकाम केलेल्या खडयाची तात्काळ विल्हेवाट लावण्यात यावे अन्यथा याठिकाणी जिवीतहाणी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.