आरक्षण सोडतीने मात्तबर अडचणीत
अनेकेश्वर मेश्राम, बल्लारपूर
बल्लारपूर तालुक्यात दोन जि. प. गट तर चार पंचायत समिती गण आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा सोपस्कार पार पडला आहे. आरक्षण सोडतीने मात्तबर राजकारणी अडचणीत आले आहे. विसापूर – बामणी जि. प. गट अनुसूचित जाती महिला तर कोठारी – पळसगाव जि. प. गट अनुसूचित जाती सर्वसाधारण म्हणून राखीव झाले आहे. यामुळे जि. प. व पं. स. सार्वत्रिक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का तंत्र देणार असल्याची चर्चा गावगड्यातील राजकारणाच्या सारिपाटावर रंगू लागली आहे.
बल्लारपूर तालुका ग्रामीण भागातील राजकारणात आजघडीला भाजपाचे वर्चस्व आहे. माजी अर्थ मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्वाचन क्षेत्रातील विसापूर – बामणी व कोठारी – पळसगाव या दोन्ही जि. प. गट व चारही पंचायत समिती गणावर मागील निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला होता. हेच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न चालविले आहे. भाजपासाठी सत्ता हेच समीकरण असल्याने, त्यांचे मनोबल उंचावले आहे. मात्र पाच वर्षाच्या कालावधीत पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे. परिणामी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रस्थापितांना राजकारणाच्या सारिपाटावर धक्कातंत्राचा अनुभव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विसापूर – बामणी जिल्हा परिषद गटात पाच तर कोठारी – पळसगाव जिल्हा परिषद गटात १२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विसापूर – बामणी जि. प. गट अनुसूचित जाती महिला राखीव म्हणून झाला आहे. यामुळे राजकीय पक्षांना या प्रवर्गातील सक्षम महिलेचा शोध घेण्याची वेळ आली आहे. याच गटातील विसापूर पंचायत समिती गण सर्वसाधारण असून बामणी गण अनुसूचित जाती महिला साठी राखीव झाला आहे. यामुळे राजकीय पक्षाची पंचाईत झाली आहे. कोठारी – पळसगाव जि. प. गट देखील अनुसूचित जाती सर्वसाधारण म्हणून राखीव झाला आहे. या गटातील कोठारी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला तर पळसगाव पंचायत समिती गण अनुसूचित जमाती साठी आरक्षित झाले आहे. यासाठी राजकीय पक्षानी उमेदवार शोध मोहीम सुरु केली आहे. काही राजकीय पक्षानी लोक पसंतीच्या उमेदवाराकडे मनधरणी सुरु केली आहे. काही हौसी उमेदवार राजकीय पक्षाच्या संपर्कात येऊ लागले आहे. आता मात्र घोडा मैदान जवळ आले असून जि. प. व पं. स. सार्वत्रिक निडणुकीसाठी बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात राजकीय वातावरण वेग घेत आहे. आपल्या निर्वाचन गटातील व निर्वाचन गणातील कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार राहणार, याची चर्चा गावापातळीवर होऊ लागली आहे.
या राजकारण्याच्या भूमिकेकडे लक्ष
बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील राजकारण भाजपाकडून तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, माजी सभापती राजू बुद्दलवार, रमेश पिपरे यांच्या भोवती फिरत असते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे घनश्याम मुलचंदानी, विनोद बुटले, घनश्याम उरकुडे यांच्या मार्गदर्शनात केले जात असले तरी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांचे निवडक कार्यकर्ते काँग्रेसची धुरा वाहत आहे. या निवडणुकीच्या धामधूमीत विसापूर – बामणी जि. प. गटात माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, बामणीचे सरपंच सुभाष ताजने, मुरलीधर गौरकार तर कोठारी – पळसगाव जि. प. गटात माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरु, सुरेश वासाडे, बंडू वासाडे, धाडू धुदबळे, अरुण पेंदोर यांनाही त्या त्या जिल्हा परिषद गटात वगळून राजकारण केले जाऊ शकत नाही. शिवसेना, वंचित बहुजन आघाडी देखील दोन्ही जि. प. क्षेत्रात अस्तित्व ठेवून आहे.
मावळते जि. प. व पं. स. सदस्य
विसापूर – बामणी : अड. हरीश गेडाम, भाजप
कोठारी -पळसगाव : वैशाली बुद्दलवार, भाजपा
विसापूर गण : विद्या गेडाम, भाजप
बामणी गण : गोविंदा पोडे, भाजप
कोठारी गण : सोमेश्वर पदमगिरीवार, भाजप
पळसगाव गण :इंदिरा पिपरे, भाजप.