भाजपचा ” हर घर तिरंगा ‘ अभियान म्हणजे खोटारड्या देशभक्तीचा देखावा

स्वातंत्र्य गौरव पदयात्रा सभेत माजी मंत्री वडेट्टीवारांचे टीकास्त्र

सिंदेवाही (प्रतिनिधी) : देशाच्या स्वातंत्र्यानंतर सतत राष्ट्रध्वजाचा तिरस्कार करणारे सत्ताधारी आज देशाची डबघाईस आलेली आर्थिक स्थिती, वाढती महागाई व ,बेरोजगारी यामुळे आलेले अपयश लपवण्यासाठी जनतेपुढे देशभक्तीचा कांगावा करून मिरवत आहे. अशा लबाड , ढोंगी देशभक्त व राजकीय सत्ता पिपासूंच्या दडपशाही धोरणामुळेच देशाला उतरती कळा लागली आहे.आज जर सावधगिरी बाळगली नाही तर उद्या भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागेल. भाजपचा हर घर तिरंगा अभियान हे केवळ खोटारड्या देशभक्तीचा देखावा असून यामागे धूर्त सत्ताधाऱ्यांची मुह मे राम.. बगल में छुरी अशी दुटप्पी भूमिका आहे. असे टिकास्त्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव निमित्ताने सिंदेवाही येथे आयोजित पदयात्रा सभेत भाजप वर सोडले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार काल गोंडपीपरी तालुक्यातील करंजी येथून स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव निमित्ताने सुरू झालेल्या गौरव पदयात्रेचा दुसऱ्या दिवसाची सुरुवात मुल येथून सिंदेवाही मार्गे क्रांतीभूमी चिमूर दिशेने करण्यात आली. याप्रसंगी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार , काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, यांच्या नेतृत्वात प्रामुख्याने कॉग्रेस जिल्हा महासचिव प्रमोद बोरीकर, मुन्ना तावाडे, सिंदेवाही तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, सावली तालुकाध्यक्ष नितीन गोहणे,उपाध्यक्ष संजय गाहाने, शहराध्यक्ष सुनिल उट्टलवार, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयुर सूचक सावली नगराध्यक्ष लता लाकडे, , महीला काँग्रेसच्या सीमा सहारे, माजी जी.प.सभापति संदिप गड्डमवार, दिनेश चिटनुरवार ,तसेच सिंदेवाही व सावली तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सर्व सेलचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले की, इंग्रजांनी देश जोडल्यानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याच्या काळात देशाच्या प्रगतीची पायाभरणी ही काँग्रेस पक्षानेच केली. देशात शैक्षणिक औद्योगिक क्रांती घडवून खऱ्या लोकशाहीच्या धोरणातून देशाचा विकास साधला. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी आयत्या बिळात नागोबा अशा दिशाभूल राजकारणाचे सोंग पांघरून जनसामान्यांपुढें श्रेयांचा खोटा पाढा वाचला जात आहे. अशा दडपशाही सरकारशी लढा देण्यासाठी पुन्हा नव्या क्रांतीची मशाल पेटवणे काळाची गरज ठरली असून देशासाठी प्राणाची बलिदान देणाऱ्या थोर नेत्यांच्या काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, सूत्रसंचालन नगरसेवक युनूस शेख, यांनी केले. याप्रसंगी सिंदेवाही व सावली तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर गौरव पदयात्रा नवरगाव मार्गे क्रांतीभूमी चिमूर कडे वळती झाली.