महसुल विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

७५ जणांनी केले रक्तदान  : महसूल कर्मचारी संघटनेचा सहभाग

बल्लारपूर (प्रतिनिधी) :  शासनाच्या प्रशासनात महसूल विभाग कणा आहे. शासनाची प्रतिमा याच विभागाच्या कामगिरीवर उजळून निघते. आपणही समाजाचे घटक असून काही देणे लागते. सर्वत्र स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात ७५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केल्या जात आहे.

बल्लारपूर उपविभागीय कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी ( पाटील ) होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर येथील तहसीलदार डाँ. कांचन जगताप, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, नायब तहसीलदार सतीश साळवे, नायब तहसीलदार तेलंग, अन्न पुरवठा निरीक्षक भारत तुंबडे, कोषागार अधिकारी पंकज खनके, शैलेश धात्रक, महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजू धांडे, सुनील चांदेवार, गणेश जगताप, दिपक कडुळे, अजय गाडगे, चंदू आगलावे, गजानन उपरे, प्रमोद आडबाले, तलाठी शंकर खरूले, मंडळ अधिकारी शंकर खोब्रागडे, प्रियंका खाडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, आपण प्रशासनातील घटक आहोत. मात्र आपली देखील सामाजिक बांधिलकी आहे. कोरोना प्रादुर्भावात आपण जनसेवा केली. समाज ऋण फेडण्यासाठी रक्तदानाचा चांगला निर्णय घेतला आहे. आपण दान केलेल्या रक्तामुळे एखाद्याचा यामुळे जीव वाचू शकतो. हे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ दान आहे. उपविभागीय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी ( पाटील ) व तहसीलदार कांचन जगताप यांच्या संकल्पनेतील रक्तदान शिबीर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी ठरणारे आहे, असे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.

संचालन दिपक कडुळे यांनी केले तर आभार प्रियंका खाडे यांनी मानले. रक्तदान शिबिराला राज्य महसूल कर्मचारी संघटना, रास्त भाव दुकान संघटना, अमन पसंद बहूउद्देशीय संस्था व तहसील, पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.