पोहायला गेलेल्या दोन तरूणांचा बुडुन मृत्यु

गोसेखुर्द धरणाच्या उपकालव्यातील घटना

चिमूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाकर्ला गावाजवळील गोसेखुर्द धरणाच्या उपकालव्यात पोहण्याकरीता गेलेल्या 3 तरुणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास चिमूर तालुक्यातील वाकर्ला गावात घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली असून रात्रीच दोघांही तरुणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रंचू पुणेश्वर कोल्हे (वय 20) व आर्यन विलास बाळबुधे (17) असे मृतकाचे नाव आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील वाकर्लायेथील रंचू पुणेश्वर कोल्हे वय 20 वर्षे, आर्यन विलास बाळबुधे वय 17 वर्षे व सोनटक्के हे तिघे मित्र शेतात कापूस पिकाला खत मारण्यासाठी गेले होते. शेतात खत मारल्यानंतर तिघेही तरूण शेतालगत असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या उपकालव्याकडे पोहण्याच्या उदेश्याने गेले. तिघेही तरूण पहिल्यांदा पोहल्यानंतर उपकालव्यातून बाहेर आले. त्यानंतर परत तिघेही पोहण्याकरीता कालव्यात उतरले. सध्या या कालव्यात पाणी साचलेले आहे. शिवाय कालव्यात गाळ साचलेला असल्याने पोहतांना ते थेट पाण्यात बुडाले व गाळात फसले. त्यामुळे ते बाहेर आले नाही. त्याचा जागीच बुडून मृत्यू झाला. त्यातील सोनटक्के हा तरुण बाहेर आला. त्याने वाचविण्याकरीता प्रचंड आरडाओरड केली परंतु जवळ कुणीच नसल्याने त्यांना वाचविण्याकरीता कुणाचीही मदत मिळाली नाही. दोघेही तरुण पाण्यातच बुडून राहिल्याने तिसऱ्या तरुणाने गावात येऊन घटनेची माहिती दिली.

नजीकच्या शेतकऱ्यांनाही घटनेची माहिती झाल्याने कालव्यावर प्रचंड गर्दी उसळली. तोपर्यंत त्या तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांच्या सहाय्याने दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पंचनामाकरून शवविच्छेदनाकरीता चिमूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. त्यानंतर रात्रीच दोघांही तरूणांवर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.