आरोग्य शिबिराचा अनेकांनी घेतला लाभ

अनेकेश्वर मेश्राम, बल्लारपूर
तालुक्यातील विसापूर येथील मुनी समाज योग बहुउद्देशीय संस्था व डाँ. अमृत कुचणकर यांच्या माध्यमातून स्थानिक मुनी समाज सभागृहात मोफत आरोग्य शिबीर रविवारी पार पडले.आरोग्य शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचप्रमाणे होमिओपॅथी उपचार रुग्णासाठी फायदेशीर असल्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अनेकांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

आरोग्य शिबिराचे उदघाटन मुनीराज वसंतराव टोंगे यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, मुनी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शालिकराव भोजेकर, मुनीराज अण्णा सुंदरगिरी, सुरेश पंदीलवार, संदीप गौरकार, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, नंदा टोंगे,डाँ. अमृत कुचणकर यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना रामभाऊ टोंगे म्हणाले,विसापूर गावात पहिल्यांदा योगाचार्य शिवकुमार शास्त्री यांच्या मार्गदर्शनात मुनीराज राजराजेश्वर टोंगे यांच्या माध्यमातून मुनी समाज संस्था कार्यान्वित झाली. त्यांच्या कार्याचा वारसा आजतागायत सुरु आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून कार्यरत आहे.याच अनुषंगाने मोफत आरोग्य शिबीर घेतले जात आहे. याचा सर्वांनी लाभ घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे मनोगतातून सांगितले. यावेळी डाँ. अमृत कुचणकर यांनी आरोग्य शिबीर आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. होमिओपॅथी उपचार वेळ घेणारा असला तरी, रोगाचे समूळ उच्चाटन करणारे आहे. यासाठी आपली मानसिकता तयार करण्याची गरज आहे, असे त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक आयोजक मुनीराज वसंतराव टोंगे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संदीप गौरकार यांनी केले, तर आभार सुरेश पंदीलवार यांनी मानले. यावेळी आरोग्य शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.