जिल्हयात जनावरांवर लम्पी आजाराचा शिरकाव

मोहबाळ्यात २३ तर शहरात २ जनावरे बाधित

भद्रावती (प्रतिनिधी) : गोवंशिय जनावरांमध्ये लंपी आजाराने तालुक्यात शिरकाव केला असून तालुक्यातील मोहबाळा आणि शहरातील किल्लावार्ड येथे गोवांशीय जनावरे लम्पी आजाराने बाधित झाले आहेत. त्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून हा आजार संक्रमित असल्याने इतर जनावरांना होऊ नये म्हणून लसीकरण सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.मंगेश काळे यांनी दिली.

तालुक्यातील मोहाबाळा येथील २३ तर शहरातील किल्ला वार्ड मधील २ जनावरांना या दुर्धर आजाराने ग्रासले आहे.त्यांचे लसीकरण झाले असून बाधित गावापासून ५ किलोमिटर परिसरातील १० गावातील जनावरांचे लसीकरण झाले.यात भद्रावती, मोहबाळा, मानोरा,कुरोडा, पिपरबोडी, कढोली,बरांज मोकासा, चिरादेवी, नंदोरी, कुनाडा,या गावातील एकूण ३५७९ जनावरांना लस मात्रा खबरदारीचा उपाय म्हणून देण्यात आली. सन २०२० मध्ये प्रथमच हा आजार आढळून आला. त्यानंतर यंदा या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असून या आजाराने राज्यातील २३ जिल्ह्यात शिरकाव केला आहे. हा आजार जनावराकडून जनावरातच संक्रमित होतो.औषधोपचाराने बरा होत असल्याने घाबरण्याचे कारण नाही.असे डॉ.काळे यांनी सांगितले. तालुका पशुधन अधिकारी डॉ.सुहास रोडे,डॉ.सचिन काकडे, डॉ.ताजने, पशुधन पर्यवेक्षक दत्ता नन्नावरे आणि इतर त्यांचे सहकारी गोवंशिय जनावरांवर लक्ष ठेऊन आहेत.