चकदुगाळा येथे भात पिकावरील शेतकऱ्यांची शेती शाळा

जनकल्याण शिक्षण संस्थेचा उपक्रम

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चक दुगाळा येथे तालुका कृषी कार्यालय व जनकल्याण शिक्षण संस्था मुल च्या वतीने धान पिकावरील विविध रोगांवर शेती शाळा आयोजित करण्यात आली. शेती शाळेला अध्यक्ष म्हणून सरपंच गोविंदराव वनकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी पर्यवेक्षक प्रकाश पराते, कृषी सहाय्यक पद्माकर वाळके, जनकल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजू गेडाम, संस्थेचे संचालक अमोल वाळके, बंडु अल्लीवार, शशिकांत गणवीर आदी मंचावर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी पर्यवेक्षक प्रकाश पराते यांनी खोडकिडीची समूळ उच्चाटनासाठी उपाययोजना सांगताना निंबोळी अर्क व दशपर्णी अर्काचे महत्त्व सांगितले तर निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धती सांगत निंबोळी अर्काची धानपऱ्यावरच फवारणी केल्यास खोडकीड व इतर रोग येत नसून पीक सशक्त आणि रोगमुक्त राहून उत्पन्नात वाढ होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर धानपिक फवारणी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याचे सखोल मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह अमोल वाळके यांनी केले.

यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धान पिकाची पाहणी करीत किड नियंत्रणासाठी कामगंध सापळे कसे लावावे व त्याचा उपयोग व महत्व काय याचं प्रात्यक्षिक पर्यवेक्षक प्रकाश पराते यांनी करून दाखविले. कार्यक्रमाचे यशस्वी संचालन पद्माकर वाळके तर आभार शशिकांत गणवीर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कृषी मित्र राजकुमार खोब्रागडे, बंडू माहोरकर, भूपेश दुर्गे, खुशाल दुधे अनिल दुर्गे, पृथ्वीराज माहोरकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.