नहरात वाहून गेलेल्या युवकाचा आढळला मृत्यूदेह

सावली (प्रतिनिधी) : तालुक्यातील जनकापुर येथे आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेला युवक गोसेखुर्द नहरात वाहून गेल्याची घटना रविवारला पाथरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. चेतन रवींद्र कुमरे असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव असून तो चारगाव येथील रहिवासी होता. वाहून गेलेल्या युवकाचा नहारात शोध घेतला असता अखेर तीन दिवसानंतर (दि. 1) रोजी व्याहाड येथील नहरात त्याचा मृत्युदेह आढळून आला.

रविंद्र हा आजीच्या अंत्यविधीसाठी कुटुंबासह जनकापुर येथे गेला होता. अंत्यसंस्कारानंतर तो नीलकंठ गेडाम, कुणाल धुर्वे, शैलेंद्र धुर्वे, चेतन धुर्वे, प्रज्वल मडावी यांच्यासोबत आंघोळीसाठी गोसीखुर्द नहरावर गेला होता. प्रज्वल हा आंघोळीसाठी नहरात उतरला. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जाऊ लागला. त्यामुळे सोबतच्या काही लोकांनी नहरात उडी घेऊन त्याला वाचविले. यावेळी चेतने ही नहारात उडी घेतली होती. तो सुद्धा वाहून जाऊ लागला. परंतु त्याला वाचण्यात यश आले नाही. अखेर तीन दिवसानंतर त्याचा मृत्यूदेह व्याहाड येथील नहरात तरंगताना आढळून आला. सदरची माहिती सावली पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृत्युदेह उत्तरीय तपासणी करिता सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.