चोवीस बोटे असलेले पुरुष वर्गीय अर्भक सुखरूप

चंद्रपूरात उपचारासाठी दाखल

अतुल कोल्हे, भद्रावती  : स्थानिक झाडे प्लॉट चंडीकामाता मंदिर परीसरात आज दि. ८ नोव्हेंबर मंगळवारला सकाळच्या सुमारात एक सजीव अर्भक आढळले. सदर पुरुष वर्गीय अर्भक एक दिवसाचे असून त्याला एकूण चोवीस बोटे आहे. त्याला चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे कळते की, स्थानिक झाडे प्लॉट चंडीकामाता मंदिर परीसरात देवानंद हिवरकर यांचे गॅरेज आहे. देवानंद हिवरकर सकाळी सातच्या सुमारात येथील मार्गाने फिरायला जात असतांना त्यांच्या गॅरेज परीसरात लहान बालकाच्या रडण्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांनी अधिक निरीक्षण केले असता तेथे त्यांना सदर अर्भक कपड्यात गुंडाळलेले दिसून आले. अज्ञात व्यक्तींनी पहाटे चार वाजताचे सुमारात सदर अर्भक या ठिकाणी ठेवले असावे.हिवरकर यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस पथक घटना स्थळी दाखल झाले. अधीक माहिती घेऊन या अर्थकाला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.सदर पुरुष वर्गीय अर्भक एक दिवसाचे असून त्याच्या हात व पायाला प्रत्येकी एक बोट अधिकचे असे एकूण चोवीस बोटे आहे. त्याला चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात पुढील उपचार व देखरेखीसाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर स्थानिक पोलीसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कोल्हे करीत आहे.

एकीकडे मानवतेला काळीमा तर दुसरीकडे अपार माणूसकीचा परीचय 
आज मंगळवार रोजी स्थानिक झाडे प्लॉट परीसरात नवजात सजीव अर्भक आढळले . या अर्भकाला प्रथम उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सजीव अर्भक आढळल्याची चर्चा परीसरात वाऱ्यासारखी पसरताच त्याला पाहणाऱ्याची गर्दी झाली. नवजात शिशूला अश्या प्रकारे वाऱ्यावर सोडणाऱ्यांचा तथा मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा उपस्थित बंधू -भगिनीकडून तीव्र निषेध व्यक्त केल्या जात होता. त्याच वेळी त्या शिशूला मातृत्व व पितृत्वाची माया देण्याकरीता अनेक बंधू -भागिनी सरसावले होते. आम्ही त्याचे आईवडील होऊ अशी प्रतिक्रीया अनेकजण व्यक्त करीत होते. एकीकडे मानवतेला काळीमा तर दुसरीकडे अपार माणूसकीचा परीचय असा प्रकारचा विरोधाभास या घटनेनंतर भद्रावतीत बघायला मिळाला.