जुन्या पेंशन योजनेच्या मागणीसाठी विदर्भ पटवारी संघ धडकणार विधानभवनावर

मूल (प्रतिनिधी) : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट करण्यात आले नाही. यामुळे महसूल विभागातील कर्मचारी या पेंशन योजनेच्या लाभासाठी मोर्चे व संप पुकारून आंदोलने देखील करण्यात आले. मात्र अद्यापही महसुलाच्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेंशन योजनेत समाविष्ट करण्यात आले नाही. यामुळे आता राज्यातील महसुलचे तलाठी व मंडळ अधिकारी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मागणी निकाली काढण्यासाठी २७ डिसें २०२२ रोजी विधानभवनावर मोर्चा धडकणार आहे.

राजस्थान, छत्तीसगड, पंजाब व झारखंड याराज्यात १ जाने २००४ रोजी व नंतर नियुक्त असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना पेंशन योजनेत सहभागी करून घेतले. यामुळे याराज्यात महसुलच्या कर्मचाऱ्यांना पेंशन देण्यात येते. मात्र राज्यातील महसुल विभागात १ नोव्हे २००५ रोजी व नंतर नियुक्त करण्यात आलेल्या महसुलच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना पेंशन योजनेत समाविष्ट करण्यात आले नाही. यामुळे सेवानिवृत्तीनंतर राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात जीवन जगणे कठीण आहे. सोबतच कुटुंबाचा उदरनिर्वाह पेन्शन योजनेअभावी हाकण्याचा प्रश्न आहे. आतापर्यंत जुन्या पेन्शन योजना लागु करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार लेखी निवेदन देण्यात आली. सोबतच मोर्चे, आंदोलन व संप देखील करण्यात आला. मात्र दखल घेतली गेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विदर्भातील अकराही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. जुनी पेन्शन योजना शासनाने लागु करावी या मागणीसाठी आता नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महसुलचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी धडक मोर्चा 27 डिसेंबर रोजी विधानभवनावर धडकणार आहे. जुनी पेन्शन योजनेच्या अनुषंगाने आयोजित मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ पटवारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे, केंद्रीय सरचिटणीस संजय अनव्हाणे यांनी केले आहे.