क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

मूल (प्रतिनिधी) : स्थानिक नवभारत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शाळेच्या सभागृहात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती अल्का राजमलवार अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका कु. उगेमुगे, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. बांडगे, पर्यावरण दूत म्हणून निवड झालेल्या शाळेतील शिक्षिका वर्षा .भांडारकर, विज्ञान शिक्षिका कु. उमक, कु. तलांडे, कु. गोंगल, कु. खोब्रागडे सौ. निताताई कारगीलवार आदी उपस्थित होते.

मान्यवरांनी दीपप्रज्वलन करुन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे व गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. यावेळी कु. उगेमुग, सौ. बांडगे यांनी मार्गदर्शन करताना माता सावित्रीच्या कार्याला उजाळा दिला तसेच वर्षा भांडारकर यांनी माता सावित्रीच्या कार्यावर ओवी व स्वलिखीत कवीता सादर केली, कु. उमक, कु.गोंगल, कु. तलांडे, कु. खोब्रागडे यांनी माता सावित्रीच्या कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणातून श्रीमती अल्का राजमलवार यांनी माता सावित्रीचे कार्य व बालीकादिनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन कु. उमक यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. गोंगल यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेचे कर्मचारी, व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.