शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे उद्या चंद्रपूरात

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात करणार मार्गदर्शन

चंद्रपूर. (प्रतिनिधी) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मां फातिमा शेख, राजमाता जिजाऊ जयंती प्रीत्यर्थ स्मृतिशेष माणिक उर्फ महाकाली जंगम जन्मदिन व माता प्रमिला माणिक जंगम स्मरणार्थ पारंपारिक तेरवी व तत्सम कार्यक्रमांना छेद देत जीवनाबद्दल वास्तववादी व सकारात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या उद्देशाने सामाजिक प्रबोधन, व्याख्यान व सन्मान पुरस्कार समारोह गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023, सायंकाळी 5.00 वाजता चंद्रपूर येथिल प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून प्रसिद्ध प्रखर वक्ता व पुरोगामी विचारवंत तथा शिवसेना उपनेता (ठाकरे गट) सुषमा अंधारे ह्या उपस्थित राहणार आहेत. ‘महापुरुषांच्या स्वप्नातील भारत: संवैधानिक मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वर्तमान परिस्थिती’ या विषयावर त्या मार्गदर्शन करतील.

या प्रबोधन कार्यक्रमात वक्ता म्हणून प्रसिद्ध विचारवंत दिलीप सोळंके हे देखिल मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. पी. लॉ कॉलेज, चंद्रपूर चे माजी प्राचार्य डॉ. ए. पी. पिल्लई राहतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री विजय वडेट्‌टीवार, विधारसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजीव कक्कड़, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, एआईएमआईएमचे शहर अध्यक्ष अजहर शेख, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, उलगुलान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू झोडे, प्रसिध्द मनोचिकित्सक डॉ. सचिन भेदे, प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. चेतन खुटेमाटे, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे उपस्थित राहणार आहेत.

या समारोहात सत्कार भूषण म्हणून समाजात उल्लेखनिय कार्य करणार्यांचा सत्कार व सन्मान करण्यात येईल. पत्रकारितेसाठी प्रमोद काकडे, कला क्षेत्रात शैलेश दुपारे, साहित्य क्षेत्रात प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर, सामाजिक क्षेत्रात डॉ. राकेश गावतुरे व डॉ. अभिलाषा बेहरे दंपतीचा सन्मान केल्या जाईल. आयोजक म्हणून शहरातील 32 संघठनांचा या आयोजनात सहभाग असणार आहे. ही माहिती आयोजकां तर्फे कबीरा इन्वेस्टिगेशन एंड रिसर्च प्रा. लि. ने दिली आहे.