भद्रावतीचा स्पंदन मानकर आंतरराष्ट्रीय अलामा अब्याकस स्पर्धेत जगात दुसरा

जगातील ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई, मलेशिया, अबुधाबी, सिंगापूर, भारत देशातील हजारो स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

अतुल कोल्हे भद्रावती :
तालुक्यातील मुरसा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे शिक्षक श्री. एस. एच. मानकर यांचा मुलगा तसेच घुग्गुस येथील माऊंट कारमेल कॉन्व्हेंटचा इयत्ता चौथी चा विद्यार्थी स्पंदन मानकर याने ९ जानेवारी ला झालेल्या जागतिक अलामा अब्याकस स्पर्धेत जगातून दुसरा नंबर पटकाविला आहे.

या वर्षी दुसऱ्यांदा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या १७ व्या अलामा अब्याकस स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात गणितीय उदाहरणाची सोप्या पद्धतीने उत्तरे काढणाऱ्या या स्पर्धेत स्पर्धकांना ७ मिनिटात १२० प्रश्न विचारण्यात आले होते. यात जगातील ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई, मलेशिया, अबुधाबी, सिंगापूर, भारत या देशातून हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात ज्युनियर गटात घुग्गुस च्या स्पंदन श्रीमंत मानकर याने दुसरा क्रमांक पटकावीला असून पुरस्कारादाखल सन्मानचिन्ह, सन्मानपदक आणि प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

तो आपल्या यशाचे श्रेय आई रेणू मानकर, वडील श्रीमंत मानकर, अलामा अब्याकस चे दिग्दर्शक पद्मावती मुथुकुमारजी, मूथुकुमार अय्यर, वाणी रामजी मॅडम, शिक्षिका मिनाक्षी नेरकर व टी. एस. नेरकर सर यांना देत असून या यशाबद्दल स्पंदनचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.