विसापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अभिनव उपक्रम

 होळीच्या पूर्वसंध्येला कर वसुलीसाठी रॅली
 गावात काढली जनजागृती मिरवणूक

विसापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव दोन वर्ष होता. कोरोना काळातील टाळेबंदीमुळे गावातील कर वसुली थांबली. त्यामुळे विकास कामावर परिणाम झाला. गावातील कर वसुलीचे प्रमाण वाढावे. गृह, पाणी व दिवाबत्ती करात वाढ व्हावी. याची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विसापूर गावात अभिनव उपक्रम राबवला. यासाठी गावात मुख्य मार्गाने रॅली काढून होळीच्या पूर्वसंध्येला जनजागृती केली. या अभिनव उपक्रमाचे गावाकऱ्यांनी कौतुक केले.

विसापूर ग्रामपंचायत सर्वात मोठी आहे. जवळपास तीन हजारावर गृह कर धारक आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गावातील कर वसुलीचे प्रमाण कमी झाले. यामुळे कर्मचारी वर्गालाच झळ पोहचत होती. यावर मार्ग काढण्यासाठी कर्मचारी वर्गच पुढे सरसावला. होळीच्या पूर्वसंध्येला कर्मचाऱ्यांनी गावाकऱ्यांनी कराचा भरणा करा, म्हणून गावात जनजागृती केली. या अभिनव उपक्रमाचे नेतृत्व ग्रामपंचायत लिपिक संतोष निपुंगे, राहूल टोंगे, शिपाई अशोक ठुणेकर, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, नलिनी शेंडे, श्याम रामटेके, शोभा येडमे, बबन कोसरे,व अन्य सहकारी कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी चौक, मनोरंजन चौक, मिलन चौक, रेल्वे चौक, अशोका बुद्ध विहार चौक, सम्राट चौक, श्रीराम चौक, राष्ट्रसंत तुकडोजी आदी चौकात मिरवणुकीच्या माध्यमातून कराचा भरणा करावा म्हणून जनजागृती केली.सदर कराचा भरणा करावा म्हणून पहिल्यांदा कर्मचाऱ्यांनी अभिनव उपक्रम राबविला.