तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या मजुरावर वाघाचा हल्ला

मजुर जागीच ठार: मारोडा बिटातील घटना

मूल (प्रतिनिधी) : रोजगार मिळत नसल्याने तेंदुपत्ता गोळा करून रोजीरोटी मिळविण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल वनपरिक्षेत्रातील मारोडा बिटात गेलेल्या मजुरावर वाघाने हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली, खुशाल गोविंदा सेानुले वय 56 वर्षे रा. भादुर्णा असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मजुराचे नाव आहे.

मूल तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जवळपपास कामानिमीत्य गेलेल्या अनेक मजुर, शेतकरी, गुराखी यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडत असतानाच, तालुक्यातील भादुर्णा येथील खुशाल गोविंदा सोनुले हे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी मारोडा बिट क्र. 2 येथे गेले असता त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. रविवारी सकाळी तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेला खुशाल घरी परत न आल्याने त्याची शोधाशोध केली असता त्यांचे शव मारोडा बिट क्रं. 2 येथे सापडुन आले. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.

घटनेची माहिती होताच वनविभागाच्या बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी जी. आर. नायगमकर, क्षेत्र सहा. पाकेवार यांनी घटनास्थळावर जावुन पंचनामा केला. वनविभागाकडुन तात्काळ 25 हजार रूपयाचे  आर्थीक मदत कुटुंबियाना करण्यात आली आहे